मनाला आवरायला, जोडायला, सजवायला, सावरायला शिका तरच जीवन सुखी होईल ; जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांचे मार्गदर्शन ; अमेरिकेतील ‘आमी परिवार ग्लोबल टॉक शो’ फेसबुक लाईव्ह मध्ये विशेष अतिथी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अमेरिकेतील ‘आमी परिवार’ म्हणजेच अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स परिवारातर्फे आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह ‘ग्लोबल टॉक शो’ मध्ये ‘मनावर घ्या’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जीवनविद्येचे आजीव विश्वस्त आणि सदगुरू श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र श्री. प्रल्हाददादा पै यांना निमंत्रित करण्यात आले होते. या टॉक शो मध्ये श्री. प्रल्हाददादा पै यांनी ‘मन’ ह्या अत्यंत अवघड विषयाला हात घालतांना सद्गुरू श्री.वामनराव पै यांनी ‘मना’वर मांडलेल्या सिद्धांताचे दाखले देत अत्यंत सोप्या भाषेत पण सखोल मार्गदर्शन करीत ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध केले.
‘मनःस्थिती बदला, परिस्थिती बदलेल’ या जीवनविद्येच्या सिद्धांताप्रमाणे जीवन जगतांना, प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख मेळ घालून संसार करण्याची गुरुकिल्ली श्रोत्यांच्या हातात देत श्री. प्रल्हाद पै यांनी प्रपंच हा परमार्थाचाच पाया आहे हे आवर्जून नमूद केले.
‘जिथे यश असते तिथे सुख असतेच असे नाही’ ह्याचे दाखले देत श्री. प्रल्हाद पै यांनी यशाला परमार्थाची जोड दिली तर जीवन खऱ्याअर्थाने ‘यशस्वी आणि स्ट्रेस फ्री’होईल असे सांगत आजच्या स्ट्रेसफूल जीवनावरचा जणू रामबाण उपायच ऐकणाऱ्यांना सांगितला.
जीवनाचं केंद्र म्हणजे मन. जीवनाचा रिमोट कंट्रोल हा मनाच्या हातात असतो. सुख,समाधान,यश,इचछा, एवढंच काय तर मोक्ष मिळवून देण्याची तसच ईश्वरापर्यंत नेण्याची ताकदही मनात असते. त्यामुळे मनाला प्रसन्न केलं,जे पाहिजे ते दिलं तर ते सुखी आणि पर्यायाने आपण सुखी हे समजावून देताना श्री. प्रल्हाद दादा पै यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘ मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण” आधी मन घेई हाती, तोचि गणराज गणपती’ ह्या अभंगांचे दाखले दिले.
मनाकडे खूप सामर्थ्य असलं तरी एकबाबतीत मात्र दुष्काळ आहे ते म्हणजे मनाकडे स्थैर्य नाही. त्यामुळे ते एकेठिकाणी राहिलं नाही तर आपण कोणत्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही त्यामुळे ‘मन स्थिर ठेवा’असा मोलाचा सल्ला देताना श्री. प्रल्हाद दादा पै यांनी सद्गुरू श्री . वामनराव पै यांच्या ‘स्थिर मन हे सुखाचा सागर’ या सिद्धांताचे महात्म्य समजावून सांगितले.
मनाचा स्वभाव हा नेहमी अधोगतिकडे जाण्याचा असतो,जसा पाण्याचा प्रवाह. कारण आपल्या मनात सकारात्मक विचारांपेक्षा नेहमी नकारात्मक विचारच येतात. त्यामुळे मनाला सावरायला शिका. आणि जसे पाण्याचा प्रवाह आपल्याला हवा तसा वळवण्यासाठी आपण पंप लावता तसेच मनाला सावरण्यासाठी ज्ञानरुपी पंपाचे सहकार्य घ्या.
पैसा, संपत्ती हवीच पण ती मिळवताना दुसर्यांना दुःख देऊन मिळवू नका, हे समजावून सांगताना श्री. प्रल्हाद दादा पै यांनी सद्गुरू श्री .वामनराव पै यांच्या सुख ही मिळवण्याची गोष्ट नाही तर देण्याची गोष्ट आहे या सिद्धांताचा अचूक दाखला दिला.
पैसा,कीर्ती,सत्ता यांच्या मागे लागू नका. आपल काम प्रामाणिकपणे आणि कौशल्यबुद्धीने केलंत की त्या गोष्टीच तुमच्या मागे लागतील. असे सांगताना श्री. प्रल्हाद दादा पै यांनी ‘मी आणि मला’ ह्या घातक शब्दांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
सद्गुरू श्री . वामनराव पै यांच्या’सावध तो सुखी’ आणि ‘शहाणपण हाच नारायण’या सिद्धांताचे महात्म्य सांगताना श्री. प्रल्हाद पै यांनी ‘द्या आणि सोडून द्या’ ह्यातील अंतर समजून घेऊन वागा असा मौलिक उपदेश केला.
‘सर्वांच्या सुखात आपले सुख आणि सर्वांच्या दुःखात आपले दुःख लपलेलं आहे’हा सद्गुरू श्री वामनराव पै यांचा सिद्धांत समजावून सांगताना मन मोठं करायला शिका,’मी -आम्ही- सर्व’असा विचार म्हणजे मनाचा मोठेपणा हे समजावून सांगितले.
दुसऱ्यांविषयी चांगला विचार करण्यास,मन निर्मळ करण्यास,मनाचं शुद्धीकरण करण्यास,मन सावरण्यास,जोडण्यास सर्वात उपयोगी आणि सोपा मार्ग म्हणजे जीवानविद्येची विश्व प्रार्थना असे सांगत श्री. प्रल्हाद दादा पै यांनी आपल्या प्रबोधनाची सांगता केली.