…तर प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील
मुंबई- सध्या विलीनीकरणाच्या मुद्यावर सुरू असलेला एसटी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि लोकांना खास करून ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास देणारा आहे त्यामुळे सरकारने आता प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील त्यानंतर सरकार आणि संपकरी एसटी कामगारांचे काय होईल याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. एसटी हे ग्रामीण जनतेचे प्रवासाचे एकमेव साधन आहे पण ते बंद असल्याने जे शहरात कामाला जाणारे लोक आहेत जे आजारी लोक आहेत जे वयोवृध्द लोक आहेत त्यांना शहरात उपचारासाठी जाता येत नाही रिक्षावाले या संपाचा फायदा उचलून ५०० ते १००० रुपये भाडे घेत आहेत अशावेळी ग्रामीण भागातील लोकांनी काय करायचे. सरकारचे डोळे फुटले आहेत का? औद्योगिक न्यायालयाने संप बेकायदा ठरवला आहे उच्च न्यायालय सुद्धा संपकरी कामगारांवर नाराज आहे तरी सरकार संपकरी कामगारांवर बडतर्फीची कारवाई का करीत नाही? हा संप पूर्णपणे बेकायदेशीर आणि प्रवाशांसाठी अन्याय कारक असल्याने सरकारने त्यावर कठोर भूमिका घ्यायला हवी होती पण सरकारच्या बोटचेपे धोरणामुळे संप चिघळला आहे. सदावर्ते संपकऱ्यांना भडकावतोय आणि सरकार गप्प आहे अशावेळी प्रवाशांनी किती हाल सोसायचे. ९० हजार एस टी कर्मचाऱ्यांसाठी सरकार ४ कोटी प्रवाशांचा छळ का करतेय लोक जर संतापले तर काहीही घडू शकेल मग ते घडावे आणि चिडलेल्या प्रवाशांच्या हातून संपकरी कर्मचाऱ्यांनी मार खावा असे सरकारला वाटते आहे का? जर यापुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर असेल. आजकाल कोणाला नोकरी मिळत नाही अशावेळी मिळालेल्या नोकरीवर लाथ मारायची दुर्बुद्धी जर त्यांना देवानेच दिली असेल तर त्यांच्या कर्माचे ते ! सरकार त्यांच्या हट्टापायी ४ कोटी प्रवाशांना वेठीस का धरते आहे? झाले तेवढे बस झाले आता सरकारने अधिक वाट नये बघू नये अन्यथा प्रवासी गप्प बसणार नाहीत.
अख्ख्या महाराष्ट्रात साडेबारा कोटी लोकांमध्ये एकता सदावर्तेच शहाणा आहे का? सरकार,प्रवासी जनता हे सगळे मूर्ख आहेत का? एस टी कामगारांना एवढं सुद्धा कळतं नाही का? उद्या समजा सरकारने खाजगीकरणाचा निर्णय घेतला तर काय करणार? तुम्ही तुमची मुले बाळे, तुमचा संसार रस्त्यावर येईल तेंव्हा तुमच्या मदतीला सदावर्ते येणार आहे का? कशाला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेताय? असाच जर हट्ट धरलात तर जे गिरणी कामगारांचे झाले तेच किंवा त्याही पेक्षा तुमचे वाईट होऊ शकते. तुम्ही आम्ही तुमच्याच गावातले बिचारे लोक आपण सगळे गरीब लोक आहोत त्यामुळे आपले जर काय वाईट झाले तर आपल्याला कुत्रा विचारणार नाही. अनिल परब, शरद पवार फडणवीस,सदाभाऊ पडळकर हे सगळे मोठे लोक आहेत, करोडपती आहेत. त्यांच्या नादाला कुठे लागता? त्यांच्याकडे गाड्या आहेत पण खेड्यातला तुमचा गरीब बांधव ज्यात तुमचे नातेवाईक सगेसोयरे आहेत त्यांना बिचाऱ्या या संपामुळे किती त्रास होतोय याचा विचार करा त्यांचा कामधंदा गेला जे आजारी होते त्यांना दवाखान्यात जायला मिळाले नाही त्यामुळे घरात तडफडून मेले त्यांचा विचार करा. उद्या तुमची नोकरी गेली तर सदावर्तेच्या डोळ्यात पाणी येणार नाही तर एसटीच्या संपामुळे खेड्यातला तुमचा जो गरीब नातेवाईक काम धंदा गमावून बसला आहे त्याच्या डोळ्यात पाणी येईल कारण तो आणि तुम्ही काही वेगळे नाहीत तुमचं आणि त्यांचं रक्तच नात आहे. तुम्ही आणि तो खेड्यातला प्रवासी एकाच गावात राहणारे आहात. एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणारे आहात. उद्या गावातला एखादा संपकरी एसटी कामगार मृत्यू पावला तर त्याच्या प्रेताला सदावर्ते किंवा अनिल परब येणार नाही तर या संपामुळे गावातल्या ज्या लोकांचा कामधंदा गेलाय ते लोक पुढे येतील त्याच्या कुटुंबाचे अश्रू पुसणारे हात गावातल्या लोकांचे असतील. सदावर्ते, फडणविस अनिल परब पुढे येणार नाही तेंव्हा संपकरी बांधवांनी आपल्या गावातील लोकांचा प्रवाशांचा आणि भविष्यातील आपल्या नोकरी धंद्याचा विचार करावा एवढीच त्यांना विनंती आहे.