शारदामाई वामनराव पै यांचे सद्गुण अंगिकारणे हीच आदरांजली ! ;
‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम राहणार आहेत. म्हणूनच शारदामाईंचे सद्गुण अंगिकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाददादा पै यांनी श्रद्धांजली वाहिली. जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई पै यांचे २५ जानेवारी रोजी महानिर्वाण झाले. वयाच्या ९७ व्या वर्षी माईंनी अखेरचा श्वास घेतला. जीवनविद्या ज्यांच्या मुळे सद्गुरु श्री वामनराव पै यांना स्फुरली त्या माईंचे वृद्धापकाळाने निधन झाले. जीवनविद्या मिशनच्या वतीने दादर येथील योगी सभागृहात शारदामाईंना आदरांजली वाहण्यासाठी ‘तेजोवलयांकिता शारदा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य नामधारकांनी व्हिडिओ च्या माध्यमातून तसेच प्रत्यक्षात माईंच्या आठवणींना उजाळा दिला. हरीपाठ, संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून माईंना संगीतपुष्प अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी नातसून प्रिया निखिल पै यांनी शारदा माईंच्या असंख्य आठवणी नामधारकांसमोर मांडल्या. पण एक आजी सासू म्हणून नाही तर शारदामाई यांचे एक स्त्री म्हणून एक अनोखे वेगळेपण होते हे त्यांनी सांगितले. शारदामाईंकडून प्रत्येक स्त्रीने शिकावे, अशी भावना यावेळी प्रिया पै यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास सद्गुरु आणि माई यांची कन्या मालन कामत पै, नातू निखिल पै, स्वप्निल कामत, नातसून प्रिया आणि पणतू यश हे उपस्थित होते.