मालवणचा विकास कधी होणार ? कोकणातील पर्यटन स्थळ अजूनही दुर्लक्षित
मालवण – ५०० किमी पेक्षा अधिक लांबीचा समुद्र किनारा, हिरवीगार डोंगर झाडी , त्यातून डोकावणारी कौलारू घरे, नागमोडी वळणा वळणाचे रस्ते ,हिरव्यागार जंगल झाडीतून खळखळून वाहणाऱ्या नद्या , व्हाळ, गोड मधुर गऱ्या सारखी बोली असलेली प्रामाणिक कोकणी माणसे अशी कोकणाची ओळख ! कोकण म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्ग पण अशा या निसर्गरम्य कोकणाचा अजूनही हवा तसा विकास झालेला नाही. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ज्या पायाभूत सोयी सुविधा लागतात त्याचा मात्र इथे अभाव . त्यामुळे म्हणजे तितक्या संख्येने पर्यटक येत नाहीत. कोकणातील सर्वच शहरे सुंदर आहेत . पण सर्वात सुंदर आहे समुद्राच्या किनारी वसलेले मालवण शहर !
मालवणी माणसाची ओळख सांगणारे तालुक्याचे शहर मालवण पण या शहरात चांगले उद्योगधंदे नाहीत.त्यामुळे केवळ मालवण तालुक्यातीलच नव्हे संपूर्ण कोकणातील लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबईत जावून स्थायिक झाले आहेत. गणपती , होळी किंवा मुलांना उन्हाळ्याची सुट्टी पडल्यावर कोकणी माणूस आपल्या गावात येतो पण तोही पाव्ह्ण्यासारखा चार दिवसांसाठी येतो आणि जातो. पण निसर्गाने आपल्या पदरात घातलेले हे हिरवेगार , निसर्गरम्य कोकण विकसित व्हावे. इथे आरोग्य, उद्योग, परिवहन पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आपल्याला काही तरी करायला हवे असे त्याला अजिबात वाटत नाही. कारण आपल्या गावा घराकडे पाठ करून तो मुंबईकर झालेला असतो. आपल्या निसर्गरम्य गावा घरात मोकळा श्वास खेण्या ऐवजी त्याला मुंबईचे प्रदूषण धकाधकीचे जीवन अधिक प्रिय वाटत असते. त्यामुळेच मालवण , कुडाळ, सावंतवाडी , वेंगुर्ला , कणकवली , यासारखी कोकणातली शहरे दुर्लक्षित राहिली. मालवण पुरते बोलायचे झाल्यास या ठिकाणी अनेक पर्यटन स्तःळ आहेत भर समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला आहे. पण आज तो भग्नावस्थेत आहेत. ज्या पुरातत्व विभागाकडे या किल्ल्याची जबाबदारी आहे त्या विभागाचे अधिकारी चुकुनही शिवप्रभूंच्या या ऐतिहासिक वारसा असलेल्या महान वस्तूकडे लक्ष देत नाहीत. सरकारलाही काही पडलेली नाही .मागे नौदलाच्या कार्यक्रमासाठी मोदी मालवणला येवून गेले. पण सिंधुदुर्ग किल्ला गुजरात मध्ये नसल्याने त्यांनी लक्ष दिले नाही. दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आंगणे वाडीच्या भराडी देवीच्या जत्रेला दरवर्षी १० लाख लोक येतात . यावेळी झाडून सगळे पुढारी दर्शनासाठी हजर असतात पण जत्रा संपली कि मागे वळून पाहत नाहीत . एवढ्या मोठ्या तीर्थ क्षेत्रा साठी मालवण वरून जेमतेम चार ते पाच एसटी बसेस आहेत. आंगणेवाडीत रिक्षाची सोय नाही कि खाजगी गाड्यांची सोय नाही. एखादा माणूस कुटुंबासह दर्शनाला गेला आणि एसटी बस चुकली कि त्याची हालत खराब होते. अशी आहे कोकणाची स्थिती . मात्र इथलेलोक खास करून कुणाल मयेकर सारखे रिक्षावाले तसेच स्थानिक रहिवाशी खूप चांगले आणि प्रेमळ आहेत पण काही लॉजवाले मात्र ग्राहकांचा खिसा कापतात. त्यामुळे मालवणच्या या समस्यांकडे सरकारने आणि इथल्या लोकप्रतीनिधिनी लक्ष देणे गरजेचे आहे.
—- किसनराव जाधव




