कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवातून जनजागृती
परिवाराने ठाण्यात साबण आणि मास्क चा केला सजावटीत पुरेपूर वापर
मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवातून जनजागृती करण्याचा प्रयत्न सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे करीत असतांनाच घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा कोरोनामुक्तीसाठी जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे येथील पाचपाखाडी विभागात वास्तव्य करणाऱ्या साहित्यिक शुभांगी जयंत लेले यांच्या परिवारातर्फेही यंदा कोरोनामुक्तीसाठी गणेशोत्सवात सजावट करुन जनतेला उत्तम संदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देश व राज्यातील जनतेला कोरोनामुक्तीसाठी मुखपट्टी (मास्क) वापरा, हात स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा असा संदेश दिला आहे. सगळेच सरकारने करावे, महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावे. आम्हाला आमच्या अधिकारांचीच फक्त जाणीव आहे, आमचे कर्तव्य आम्हाला कुणी सांगू नये, अशा मानसिक प्रवृत्तीतून लोकांनी बाहेर येण्याची गरज आहे. हेच या गणेशोत्सव सजावटीतून लेले परिवाराने दाखवून दिले आहे. आनंद जयंत लेले, स्नेहा आनंद लेले आणि कु. मधुरा आनंद लेले यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवात 42 लाईफबॉय, 7 पँकेट डबल बी, चार विम बार, साबण चुऱ्याची पेस्ट तसेच मुखपट्टी (मास्क) चा वापर करुन देव्हारा बनविला आणि त्यात श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. आनंद लेले आणि परिवार दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या सजावटीतून जनजागृती करीत असून स्वर्गीय जयंतराव लेले यांचा कलोपासनेचा वारसा पुढे अत्यंत दमदारपणे चालविला आहे. श्रीगणेशाची मूर्ती सुद्धा प्लॅस्टर ऑफ पँरिस, शाडू माती ऐवजी त्रिधातूची असल्याने ती पर्यावरण पूरक आहे. अनेक पुरस्कार लेले परिवाराने आपल्या या जनजागृती करणाऱ्या श्रीगणेशोत्सवाच्या माध्यमातून पटकावले आहेत.