रतन टाटा आणि बांबू सिंधुदुर्ग पॅटर्नबांबू हे माझे पहिले प्रेम आहे..- रतन टाटा
मालवण – वीस वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबू लागवड व त्यावर प्रक्रिया असा प्रकल्प सुरू केला होता. मा. सुरेश प्रभू ज्यावेळी पहिल्यांदा राजापूर मतदार संघातील खासदार झाले, त्यावेळी आपण शाश्वत विकास (sustainable development) काम केले पाहिजे असा अट्टाहास होता. या अट्टाहासाने भारतातील पहिला बांबू प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झाला. खूप टप्पे-टोनके खात वेगवेगळ्या बांबूवर प्रयोग करून शेतकऱ्यांना एकत्र करून त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी कॉनबॅक Kokan Bamboo and cane development centre व चिवार CHIVAR ही कंपनी स्थापन करण्यात आली. या मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम सुरू झाले. सगळी सोंग आणता येतात पण आर्थिक सोंग आणू शकत नाही. अशीच परिस्थिती कॉनबॅक मध्ये होती. बऱ्याच आर्थिक अडचणीतून ही संस्था मार्गस्थ होत असताना सर्व गोष्टी अर्थकारणावर थांबत होत्या. पण मा. संजू कर्पे, मा. मोहन होडावडेकर यांनी हे बांबू मिशन म्हणूनच काम सुरू केले होते. 24 तास 365 दिवस ह्या बांबूच्या प्रकल्पामध्ये पूर्ण जीवन समर्पित केल्यासारखे काम करत होते. यात आमच्यासारख्यांचा खारीचा वाटा होता. पण काही केल्या याला ग्लोबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणण्यास कंपनी कमी पडत होती.
एक दिवस चमत्कार झाला टाटा ट्रस्ट कडून कर्पे यांना ई-मेल आला की आपणास मा. रतन टाटा यांनी बांबू मिशन साठी भेटण्यास बोलवले आहे. ही मिटिंग वर्ल्ड ट्रेड सेंटरला ठेवण्यात आली आहे. कर्पेंना कुणीतरी मस्करीने ई- मेल केला असे पहिल्यांदा वाटले. पण आपण जाऊन तरी बघूया म्हणून कर्पे मिटींगला मुंबईस गेले. सांगितलेल्या वेळेमध्ये मीटिंग संपन्न झाली. कर्पे सांगतात समोर एवढी मोठी व्यक्ती बघून मी अचंबित झालो. मला काही बोलताच येईना. बांबूमध्ये केलेल्या कामाचे प्रेझेंटेशन लॅपटॉप वर दाखवत होतो. हे मी सगळं बघितलेलं आहे. तुम्हाला काय अपेक्षित आहे. असा प्रतिप्रश्न रतन टाटांनी कर्पे यांना केला. कर्पेंना मिनिटभर काही सूचेना! प्रकल्प आर्थिक अडचणीत असल्याने आम्हाला आर्थिक मदत झाली तर बरी पडेल एवढेच कर्पे बोलले. किती आर्थिक मदत अपेक्षित आहे हे विचारून घेऊन बँकेचे डिटेल्स देण्यास सांगितले. पाच ते सहा मिनिटं मध्ये मीटिंग संपली. कर्पे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. सर्वजण आमच्याकडं माहिती घेतात त्याच्यातलाच हा प्रकार, असे समज करून सर्वजण बसले होते. पण पंधरा-वीस दिवसानंतर बँकेतून फोन आला… आपल्या खात्यावर मोठी रक्कम जमा झाली आहे. सर्वांना आश्चर्य वाटले. ज्यावेळी बँकेमध्ये बघितले, त्यावेळी टाटा ट्रस्ट करून आर्थिक मदत म्हणून हा निधी उपलब्ध झालेला होता. निधी जमा झाल्यावर सर्वजण खुश होते. दोन-तीन महिने या निधीचे काय करायचे हा विचार करण्यातच गेले. आता काय करायचे? निधी परत करायचा असे ठरविण्यात आले. यासंबंधी कर्पे यांनी टाटा ट्रस्ट ची बोलणे केले. त्यावेळी उत्तर आले एकदा दिलेला निधी टाटा ट्रस्ट परत घेत नाही. आपल्याला प्रकल्प हा करावाच लागेल. काम करण्याशिवाय पर्याय नाही. आम्हाला रतन टाटा यांच्याशी बोलणे करायचे आहे.आता आपले त्यांच्याशी काही बोलणे होऊ शकत नाही. जोपर्यंत रतन टाटांकडे बांबूमध्ये तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल युनिक प्रोजेक्ट बाबत माहिती मिळत नाही तोपर्यंत आपल्याला भेट मिळणे शक्य नाही, असे उत्तर आल्यानंतर काय करणार काम करण्याशिवाय पर्यायच नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबूसाठी वेगळे काम सुरुवात झाले. कॉम्पॅक्ट बांबू म्हणजेच बांबूचा पट्टयांचा फ्लाऊड तयार करण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरु झाला. भारतातल्या फ्लाऊड बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांबरोबर स्पर्धा चालू झाली. एका बाजूला याची आर.एन.टी करत असताना, दुसऱ्या बाजूला भारतातील नामांकित कंपनीमध्ये, फाइ स्टार, सेवन स्टार हॉटेलमध्ये, स्वागत कक्ष, फर्निचर ,छोटे हर्ट्स यांचे हटके काम सुरू होते. मालदीव येथील हॉटेलचे काम, फिफा वर्ल्ड फुटबॉल कपचे रिसेप्शनचे काम असे जागतिक दर्जा असणाऱ्या कामांमध्ये पण कॉनबॅक कंपनी काम करत होती. जागतिक दर्जाची बांबू मधील काम करणाऱ्या व्यक्ती कंपनीशी जोडल्या होत्या. याची माहिती कंपनीने न देता ही माहिती रतन टाटा पर्यंत पोहोचत होती. ज्यावेळी कॉम्पॅक्ट बांबूचे काम पूर्ण झाले तेव्हा टाटांची भेट अपेक्षित होती. ती भेट सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे मा.संजीव कर्पें बरोबर संपन्न झाली. रतन टाटा यांनी गौरव करत असताना कामाबद्दल समाधानी व्यक्त केले. त्यावेळी रतन टाटांचे एक वाक्य होते.
बांबू हे माझे पहिले प्रेम आहे.
Bamboo is my first love. कारण बांबूमध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. हे पहिल्यांदाच स्पष्ट झाले.
वेळोवेळी टाटा ट्रस्टचे मार्गदर्शन मिळत गेले आणि भारतामध्ये बांबू पॅटर्न म्हणजे सिंधुदुर्ग पॅटर्न हे समीकरण देशात नव्हे तर जगात गौरव होऊ लागला. रतन टाटाच्या दूरदृष्टी ठेवून केलेल्या छोट्या व्यवसायामध्ये मदत केवढे मोठे काम करू शकते याचा प्रत्यय म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांबू मिशन. सर्वात मोठ्या उद्योगपती रतन टाटांनी एका संस्थेवर विश्वास ठेवणे हेच कंपनीच्या भाग्याचे होते.
मा. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
विजय केनवडेकर– मालवण