ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

स्वामी समर्थच्या कबड्डीत भारत पेट्रोलियमची बाजी

स्वामी समर्थ कबड्डी
मुंबई, दि. १२ (क्री.प्र.)- संदीप धुल आणि शुभम शिंदेच्या मगरमिठीनंतरही (सुपर टॅकल) भारत पेट्रोलियमने मध्य रेल्वेचा थरारक संघर्ष २६-२५ असा रोखत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर आपले नाव कोरले आणि या मोसमात व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाचा चौकार ठोकला.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत दिलीप परब क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना अक्षरशा हृदयाचे ठोके चुकवणारा कबड्डीतला खरा थरार अनुभवायला मिळाला. उपांत्यपूर्व फेरीत एकतर्फी लढतींनी कंटाळलेल्या कबड्डीप्रेमींनी आज प्रत्यक्षात रोमांचाच्या मेजवानी मनसोक्त आस्वाद घेतला. इंडियन ऑइल, सारस्वत बँक आणि एलआयसीच्या पाठिंब्यामुळे दिमाखदार झालेल्या या कबड्डी सोहळ्याचा समारोप दिलखेचक झाला. उपांत्य फेरीत आयएसपीएलचे कडवे आव्हान मोडून अंतिम फेरी गाठणार्‍या भारत पेट्रोलियमने यहां के हम सिंकदर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. आयएसपीएलचा अस्लम इनामदार लक्षवेधी खेळाडू ठरला. मध्य रेल्वेचा आशिष कुमार अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. बीपीसीएलच्या गिरीश इरनाकने स्पर्धेतील सर्वोत्तम पकडबहाद्दराचे तर रिशांक देवाडिगाने सर्वोत्तम चढाईपटूचे वैयक्तिक पुरस्कार जिंकले. मध्य रेल्वेचा पंकज मोहिते स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

सुपरस्टार कबड्डीपटूंची मांदियाळी जेतेपदासाठी आमनेसामने आली होती. अत्यंत सावध सुरुवात करणार्‍या दोन्ही दिग्गजांनी पहिल्या २० मिनिटात कोणताही धोका न पत्करता खेळ केल्यामुळे गुणफलक एकाच वेगाने पुढे सरकत होता. तरी आकाश पिकलमुंडेच्या खोलवर चढाईने पेट्रोलियमला १४-११ अशी ३ गुणांची आघाडी मिळवून दिली होती. ती आघाडी दुसर्‍या सत्रात शेवटची चार मिनीटे असताना २३-१८ अशी होती. एकीकडून आकाश आणि रिशांक देवाडिगा आघाडी वाढवण्याचे प्रयत्न करीत होते तर दुसरीकडून आशिष कुमार आणि पंकज मोहिते बरोबरी साधण्यासाठी संघर्ष करीत होते.

शेवटची चार मिनीटे उरलेली असताना बीपीसीएलने २३-१८ अशी आघाडी मिळवत आपली स्थिती भक्कम केली होती. मध्य रेल्वेचे डब्बे घसरणार अशी स्थिती होती. मैदानात केवळ त्यांचे दोनच खेळाडू शिल्लक होते. त्यांना बाद करून आपला विजय निश्चित करण्याचे बीपीसीएलचे प्रयत्न होते, पण मैदानात उभे असलेल्या संदीप धुल आणि शुभम शिंदेने पकडीचा भन्नाट खेळ केला. दोघांना टिपण्यासाठी सरसावलेल्या आकाश पिकलमुंडेला संदीप धुल आणि शुभम शिंदेने मगरमिठी मारली की त्यातून आकाश सुटूच शकला नाही. मग २४ व्या मिनिटाला पुन्हा हेच दृश्य दिसले. तेव्हा गुणफलक २५-२१ होता आणि जे पिकलमुंडेला जमले नाही ते करण्यासाठी रिशांक देवाडिगा आला, पण संदीप धुलने शुभमच्या साथीने रिशांकचीही पकड करून सामन्याला कलाटणी देण्याचा आणखी एक प्रयत्न केला. स्कोर २५ -२३ होता. शेवटचे मिनिट होते, पिकलमुंडेची आणखी एक चढाईत आणि त्यात त्याने एक गुण मिळविला. स्कोर झाला २६-२३.पुन्हा एकदा पिकलमुंडे पुढे सरसावला आणि एकाच क्षणात शुभम शिंदेने त्याला निदान रेषेवर अक्षरशा खेचले. शुभमला मगरमिठीचे दोन गुण मिळाले आणि तो चढाई करणार तोच पंचानी समयसमाप्तीची घोषणा केली. भारत पेट्रोलियमने अवघ्या एका गुणाने बाजी मारली.

सामना पेट्रोलियमने जिंकला असला तरी शेवटच्या क्षणी संदीप धुल आणि शुभम शिंदेच्या मगरमिठीने सामन्याची रंगत वाढवली. धुलने पकडीचे आठ तर शुभमने ५ गुण मिळविले. पंकज मोहितेला १७ चढायांत केवळ ३ गुण मिळविता आले आणि त्याची दहावेळा झालेली पकड रेल्वेच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली. आशिष कुमारने १४ चढायांत ७ गुण मिळविले. बीपीसीएलकडून पिकलमुंडेने १८ चढायांत ७ गुण घेतले तर रिशांकला १६ चढायांमध्ये केवळ तीन गुण मिळविता आले.अक्रम शेखने ६ तर गिरीश इरनाकने ३ गुण पकडींमध्ये मिळवित संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी भारत पेट्रोलियम आणि आयएसपीएल यांच्यातला उपांत्य सामना ३६-३६ असा बरोबरीत सुटला होता आणि पाच-पाच चढायांच्या डावात पेट्रोलियमने ७-४ अशी बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली होती. दुसर्‍़या सामन्यात मध्य रेल्वेने युनियन बँकेवर ४३-२६ अशी सहज मात करीत अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आशिष चेंबुरकर, शाखाप्रमुख संजय भगत आणि स्पर्धेचे आयोजक आणि विभागप्रमुख महेश सावंत यांच्या हस्ते पार पडला.

error: Content is protected !!