शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर एक दिवसअगोदरच १२ ऑक्टोबरला सुनावणी होणार
शिवसेनेच्या १६ आमदारांचं काय होणार? यावर कदाचित उद्या मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रतेवर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुनावणी होणार आहे. आधी ही सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार होती. पण विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी घेतली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी एक दिवस आधीच ही सुनावणी का घेतली जात आहे याची माहिती दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी-२० परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचं मला आमंत्रण देण्यात आलं आहे. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेची जी सुनावणी १३ ऑक्टोबरला होती. ती मी १२ ऑक्टोबर रोजी घेतली आहे. मला या विषायात कोणताही दिरंगाई करायची नाही. लवकर निर्णय घ्यायचा आहे. वेळ घालवायचा नाहीये. म्हणून उद्याच सुनावणी करणार आहे, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
आमदार सुनावणीबाबत दिरंगाई केली जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला दिरंगाई करायची असती, वेळ काढायचा असता तर मी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं कारण सांगून सुनावणी पुढे ढकलली असती. पण मी सुनावणी आधीच घेतली. त्यामुळे मला वेळ काढायचाय की सुनावणी लवकर संपवायचीय हे तुम्हीच पाहा. माझ्यावर जी टीका होत आहे, आरोप केले जात आहेत. त्याचा हेतू काय हे मला माहीत आहे. पण अशा टीकेने माझ्या निर्णय प्रक्रियेवर फरक पडणार नाही. जे लोक टीक करत आहेत. त्यांना निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडायचा असेल त्यामुळे ते असं करत असावेत. तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो अशा टीकेतून माझ्यावर कोणताही दबाव पडणार नाही. पडू देणार नाही. नियमानुसारच मी निर्णय घेईल, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.