सद्गुरू श्री वामनराव पै यांची 101 वी जयंती रक्तदान शिबिराने उत्साहात साजरी ; कांदिवली येथील “रक्तदान शिबीरास ” भरघोस प्रतिसाद
मुंबई दि (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या 101 व्या जयंती निमित्त मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र यांच्या सहकार्याने महिला आधार भवन, कांदिवली येथे ‘रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले. 110 जणांनी रक्तदान करण्यासाठी नोंदणी केली होती. त्यातील 85 जणांनी रक्तदान केले. व 12 जणांनी अवयव दानासाठी नोंदणी केली.
सर्व रक्त दात्यांचे व अवयव दात्यांचे जीवनविद्या मिशनच्या वतीने सौ. सुषमाताई कळमकर विश्वस्त जीवनविद्या फाऊंडेशन यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मीनाताई ठाकरे रक्तकेंद्राचे प्रमुख श्री रमेश इस्वलकर यावेळी बोलतांना म्हणाले की सध्या खूप ठिकाणी रक्ताचा पुरवठा कमी आहे आणि अशावेळी जीवनविद्या मिशनने रक्तदान शिबीर राबविले म्हणून जीवनविद्या मिशनचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
या शिबिरास भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार श्री गोपाळ शेट्टी, भाजपाचे पदाधिकारी संजय उपाध्याय यांनी भेट दिली. श्री. गोपाळ शेट्टी यांनी जीवनविद्या मिशन च्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले तसेच जीवनविद्या मिशन चे प्रणेते सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी महावीरनगर कांदिवली (प), चारकोप, गोराई, बोरिवली, मालाड पश्चिम, मालाड पूर्व, गोरेगाव, जोगेश्वरी येथून आलेल्या रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून रक्तदान शिबिरास भरघोस प्रतिसाद दिला. उपस्थित रक्तदात्यांना भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
जीवनविद्या फाउंडेशनच्या विश्वस्त सौ सुषमा कळमकर, श्री राजन कळमकर, महिला आधार भवन समिती प्रमुख श्री महेंद्र खराडे, कोअर कमिटी सदस्य नवनाथ हळदणकर, जनार्दन विनेरकर, अजिता घाडी, पदाधिकारी – शुभम तेली, चिन्मय राणे, अभिजित गिरासे, संदीप चिपळूणकर, तेजस धुमाळ हे उपस्थित होते.
मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र येथील उपस्थित डॉक्टर, स्टाफ तसेच रक्तदान करण्यासाठी उपस्थित रक्तदाते या सर्वांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.