पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३५ हजार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण
नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडी-नाव्हा शेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन झालं. या सेतूच्या उद्घाटनानंतर नवी मुंबई विमानतळाच्या मैदानावर मोदींची सभा पार पडली. यावेळी मोदींनी 35 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा पाढा वाचला. तसेच विकासकामांसाठी मोदी सरकार समुद्रालादेखील धडकू शकतं आणि लाटांनाही चिरु शकतं, असं नरेंद्र मोदी आपल्या आक्रमक शैलीत म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामांचं देखील कौतुक केलं. यावेळी त्यांनी महिला सशक्तीकरणाच्या योजनांविषयी माहिती दिली. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेकडो महिलांचे देखील आभार मानले.
“भारताच्या विकासासाठी आम्ही समुद्राला धडकू शकतो. लाटांनाही चिरु शकतो. आजचा कार्यक्रम संकल्पातून सिद्धी प्राप्त करण्याचं प्रमाण आहे. मी 24 डिसेंबर 2016 चा दिवस विसरु शकतो ज्यादिवशी मी अटल सेतूच्या भूमीपूजनासाठी आलो होतो. मी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करुन म्हटलं होतं की, देश बदलेल आणि पुढे सुद्धा जाईल. या व्यवस्थेत वर्षानुवर्षे काम लटकवण्याची सवय पडली होती. त्यामुळे नागरिकांना काहीच आशा उरलेली नव्हची. लोक विचार करायचे की त्यांच्या जिवंतपणी मोठे पुरस्कार होणं हे कठीण आहे. त्यामुळे मी सांगितलं होतं, लिहून ठेवा देश बदलणार. ही सर्व मोदीची गॅरंटी होती”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“मी आज छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा नमन करुन, मुंब्रा देवीला नमन करुन, सिद्धीविनायक देवाला वंदन करुन हे अटल सेतू मुंबईकर आणि देशाच्या जनतेला समर्पित करतोय. कोरोना संकट असतानाही या सेतूचं कामकाज सुरु राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यासाठी लोकार्पण, उद्घाटन एक दिवसाचा कार्यक्रम नसतो, आमच्यासाठी प्रत्येक प्रोजक्ट भारताच्या नवनिर्माणाचा माध्यम आहे. प्रत्येक विटेने इमारत बनते तसंच अशा प्रोजेक्ट्समधून भव्य भारताची इमारत बनत आहे”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
“आज देशाच्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाचे 35 हजार कोटी विकासकामांचं लोकार्पण झालं. हे प्रोजेक्ट रोड, रेल्वे, मेट्रो, पाणी सारख्या सुविधांशी संबंधित आहे. बरेच प्रोजेक्ट तेव्हा सुरु झाले होते जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा डबल इंजिनचं सरकार स्थापन झालं होत. देवेंद्र यांच्यापासून एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यापर्यंतचा सर्व टीमच्या प्रयत्नांना हे यश आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो”, असंही मोदी यावेळी म्हणाले.
