पुढील तीन चार महिन्यात महापालिका निवडणूक – फडणवीस
भाजप अधिवेशनात अमित शहा यांचा उद्धव ठाकरे – शरद परांवर हल्लाबोल
शिर्डी – विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. या निवडणुका कधी होणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. शिर्डी येथे भाजपचा राज्यस्तरीय मेळावा आज पार पडला. यावेळी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील, असे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगानेच आज शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन बोलावल्याचे म्हटले जात आहे. या अधिवेशनात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवार जोरदार हल्ला चढवला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेपेक्षाही मोठा विजय प्राप्त करायचा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील. विधानसभेत विजय मिळवला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.अमित शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आपले विरोधक वाट बघत बसले होते की महाराष्ट्रात आता आपले सरकार येणार आहे. त्यांचे हे स्वप्न सुद्धा आपण सर्वांनी मिळून धुळीस मिळवले. मी जेव्हा आलो होतो साडे ९ हजार कार्यकर्त्यांशी मी संवाद साधला होता. काही निवडणूक असे असतात जे देशाच्या राजकारणाला बदलून टाकतात. महाराष्ट्र सरकारने हे करून दाखवले आहे. या सगळ्याचे शिल्पकार म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा प्रणाम
तुम्ही पुन्हा एकदा परिवारवादाचे राजकारण करणाऱ्यांना कानफडात मारत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. काही जणांना उमेदवारी नाही मिळाली, पण सर्वांनी मिळून महायुतीला निवडून देण्याचा निश्चय केला होता. महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले की एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मोदींच्या विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिला आहे.