“काश्मिर फाइल्स” इतिहास घडवणार !!!
19 जानेवारी 1990 रोजी काश्मिरी दहशतवाद्यांनी अत्याचार करून लाखो काश्मिरी हिंदूंना अर्थातच काश्मिरी पंडितांना त्यांचे घरदार सोडायला भाग पाडले होते. त्या घटनेने काश्मिरी पंडित काश्मिरी खोऱ्यातून इतिहासजमा झाले होते. पण आज काश्मिरी पंडितांची तीच “शोकांतिका” “काश्मीर फाइल्स” च्या रूपाने सिनेमागृहात इतिहास घडवत आहे. अभूतपूर्व इतिहास घडवणार आहे.
कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता अवघ्या 650 सिनेमांगृहांमधे प्रदर्शित झालेल्या या अवघ्या 12 कोटी बजेटच्या शोकांतिकेने पहिल्या दिवशी साडेतीन कोटींचा व्यवसाय केला. सिनेमाचा तोच आकडा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता, पण दुसऱ्या दिवशी तो आकडा चक्क दुप्पटीपेक्षा मोठा झाला. म्हणजेच दुसऱ्या दिवशी काश्मिर फाईल्सने साडेआठ कोटीपर्यंत कलेक्शन केले. हे आकडे अनपेक्षित आहेत. अभूतपूर्व आहेत. सिनेमासृष्टीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की पहिल्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन दुप्पट आहेत.
काश्मिर फाइल्सला अवघ्या भारतातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्याच्या शोजचा आकडा वाढतच जाणार हे आता वेगळे सांगायला नको. 650 थियेटरमधे रिलीज झालेला हा सिनेमा येत्या दिवसात हजारापेक्षा अधिक थियेटरमधे दाखवला जाईल. त्याच्या शोजची संख्याही दुपटी तिपटीने वाढेल. पहिल्या दोन दिवसांतच सिनेमाचा पूर्ण खर्च वसूल करणाऱ्या या शोकांतिकेने पहिल्या आठवड्यात 50 कोटींचा व्यवसाय केला तरी आश्चर्य वाटणार नाही. रविवारचा आकडाही निश्चितच ऐतिहासिक असेल. अविश्वसनीय असेल. जे पाहून सर्वांचेच डोळे पांढरे पडतील सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहता काश्मिर फाइल्स 100 कोटींचा गल्ला गाठून इतिहास रचणार हे निश्चित आहे. बॉलीवूडला आलेले मरगळ काश्मिर फाईल्सने झटकली, हेसुद्धा अविश्वसनीय आहे.
काश्मिर फाइल्सच्या निमित्ताने काश्मिरी पंडितांनी जे सोसलं, जे भोगलं ते सत्य सिनेमाच्या भव्य पडद्यावर अनुभवता आलंय… सत्य कधी लपत नाही आणि हृदय पिळवटून काढणारं हे सत्य आता इतिहास घडवणार. इतिहास रचणार. हा इतिहास सर्व भारतीयांनी, युवा पिढीने जाणायलाच हवा, पाहायलाच हवा.