राहुल गांधीच्या यात्रेच्या वेळीच
कॉंग्रेस कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर
मुंबई- एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाली. तर दुसरीकडे नंदुरबारचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर असून त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पद्माकर वळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधीनी वारंवार ओबीसींचा अपमान केला आहे. म्हणून ओबीसी समाज राहुल गांधींवर नाराज आहे. या प्रवासात राहुल गांधींना गिफ्ट काय मिळणार तर काँग्रेसचे नेते पक्ष सोडणार आहेत. राहुल गांधींची यात्रा जसं जसं शिवाजी पार्कजवळ येईल, तसं तसं काँग्रेस नेते पक्ष सोडतील. काँग्रेस कमजोर झाली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे लिस्ट आली आहे. पद्माकर वळवी हे नेते आहेत त्यांनी माझी भेट घेतली आहे. आज नंदुरबारमध्ये राहुल गांधी आहेत आणि त्यांचे नेते मला भेटायला येतात यातून कळतं कांग्रेसमध्ये काय सुरु आहे. राहुल गांधी हे काँग्रेस डुबाओ नेते आहेत. राहुल गांधी हे काहीतरी बोलायचं म्हणून बोलत असतात. काँग्रेसचे हे नेहमी संभ्रमाचं राजकारण करत आलंय. राहुल गांधींच्या बोलण्याला काही अर्थ नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे