काँग्रेससह गांधी कुटुंबाची भुमिका आरक्षण विरोधीच-तोच फुत्कार राहुल गांधींच्या माध्यमातून समोर आलाय
rभाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात
मुंबई- पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधींपासून काँग्रेसची भुमिका आरक्षणाच्या विरोधातच राहिली आहे आणि तोच फुत्कार पुन्हा राहुल गांधींच्या माध्यमातून समोर आलाय, असा घणाघात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेत राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे संतापाची प्रचंड लाट उसळली असल्याचेही दरेकरांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी आरक्षणविरोधी केलेल्या वक्तव्याविरोधात आज चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महायुतीच्या वतीने राहुल गांधी आणि महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी ‘नेहरू असो वा राहुल गांधी काँग्रेसला आरक्षणाचे वावडे का?’, ‘काँग्रेस आरक्षणविरोधी संविधान विरोधी’, मतांसाठी काँग्रेसचे जनतेला साकडे, आरक्षणाशी यांचे कायमच वाकडे’, अशा आशयाचे फलकही झळकविण्यात आले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दरेकर म्हणाले कि, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे आमचे दैवत आहे. संविधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण या देशातील पीडित, शोषित, वंचित, उपेक्षित समाज आहे त्यासाठी दिलेय. असे असताना राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करू अशी भुमिका घेणे म्हणजे आरक्षणविरोधी असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेय. आम्ही काँग्रेस, राहुल गांधींचा धिक्कार करतो. जिथे जिथे राहुल गांधी जातील तिथे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या आरक्षण प्रेमी जनतेने पीडित, शोषित, वंचित समाजाने राहुल गांधींना पळवून लावले पाहिजे, असे आवाहनही दरेकर यांनी केले.
तसेच पुढे बोलताना दरेकर म्हणाले कि, राहुल गांधी यांना या देशात संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. केवळ लोकसभेला संविधान हातात घेऊन चालत नाही तर संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण आहे त्या बाबतीत तुमची भुमिका अशी असेल तर संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील तुमचे प्रेम पुतना मावशीचे होते. याची सव्याज परतफेड महाराष्ट्रातील, देशातील जनता केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दरेकरांनी दिला.
बाळासाहेब थोरात यांच्या ट्विटवर बोलताना दरेकर म्हणाले कि, बाळासाहेब थोरात जर बहिरे नसतील तर त्यांना आम्ही क्लिपही पाठवून देण्याची व्यवस्था करतो. त्या क्लिपमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण रद्द करू असे बोलले आहेत. आता त्या ठिकाणी सोंग घेतलेल्यांना ऐकायलाही येणार नाही आणि दिसणारही नाही. बाळासाहेब थोरात यांचे ढोंग, सोंग आहे. त्यांना जनता सगळीकडून पळवून लावेल तेव्हा राहुल गांधी बोलले कि नाही याचे प्रत्यन्तर येईल.