ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याविश्लेषण

विधानमंडळासाठी आधी बा.बा. नंतर इंटरनेट, गूगल, फाईल्स डाउनलोड सर्वकाही

–कराडमध्ये जसे पृथ्वीराजबाबा, कृष्णा मेडिकलमध्ये जसे सुरेशबाबा… विधानभवनात पाउल टाकले की… आमदार, मंत्री त्या सर्वांसाठी गं्रथालयातले बाबा….पण, गं्रथालयातले हे ‘बाबा’ पश्चिम महाराष्ट्रातले असले तरी हे तसे ‘बाबा’ नाहीत. त्यांच्या अद्याक्षरात बा.बा. असा क्रम आहे. म्हणजे त्याच नाव आहे बाळासाहेब बाबूराव वाघमारे… या अद्याक्षरातून नाव तयार झालं…. बा.बा… पण विधानभवनात आमदार असो, मंत्री असो सर्वांनी अद्याक्षरातली दोन टिंब काढून टाकली आणि मग हे बा.बा. सगळ्यांसाठी गेली ३२ वर्ष ‘बाबा’ कधी झाले ते कळलही नाही. पण ते एका दिवसात झाले नाही. त्यांची तपश्चर्या आहे, जिद्द, आहे, मेहनत आहे. या बाबांनी आयुष्यात नाव मिळवेपर्यंत किती कष्ट केलेत, गरीब परिस्थितीवर हार न मानता या माणसाने आपले कर्तृत्व सिध्द करुन दाखवले. पुन्हा सतत हसतमुख. सगळ्यांना मदतीसाठी तयार त्यामुळे विधानमंडळात आमदार असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो.. त्यांना इंटरनेट, गुगल, हार्डडिस्क कशा कशाची गरज पडत नाही. विधानसभेचे अध्यक्ष असोत, विधानपरिषदेचे सभापती असोत. सर्वांच्या तोंडी एक नाव अगदी सहज येतं.. ‘बाबाकडे जावून माहिती आण..’ विधानमंडळासंदर्भातली पाहिजे ती माहिती, गेल्या ८३ वर्षांतल्या विधानसभेमधला कोणताही संदर्भ, लोकसभेमधला कुठचाही संदर्भ, कोणत्याही पुस्तकातला संदर्भ. जे मागाल ते, बाबांच्या जीभेवर आहे. ‘सेव्ह’ कल्पना अलिकडे आली पण विधानमंडळात बाबा हाच एक मोठा कॉम्प्युटर आहे…
आज हे सगळ सांगण्याच कारण म्हणजे बाळासाहेब बाबूराव वाघमारे म्हणजे विधानमंडळातील ग्रंथपाल आणि संशोधन अधिकारी १७ आॅक्टोबर रोजी ६१ वर्षांचे होत आहेत…. मराठीत काही वाईट म्हणी आहेत, त्यातली ‘साठी बुध्दी नाठी’ ही एक वाईट म्हण आहे. पण साठीनंतर जीवनातील अनुभवाच्या शिदोरीवर माणूस किती कार्यक्षम होतो हे अशा ‘बाबा’कडे पाहिल्यावर समजते, अशा या बाबांचा गौरव ग्रंथ निघत आहे. तो गौरव ग्रंथ बाबावर नाही तर ग्रंथाच नाव आहे..
‘थोरा-मोठ्यांच्या सहवासातील बा.बा.वाघमारे…’ या ग्रंथासाठी प्रस्तावना द्यावी असे मला सुचविण्यात आले. बाबाच्या ॠणातून मुक्त होण्यासाठी नव्हे तर, त्याच कर्तृत्व सांगण्यासाठी मी संधीची वाटच पाहात होतो. कारण, गेल्या ६0 वर्षांत मी लिहीलेल्या ३0 पुस्तकांना संदर्भासाठी बा.बा.नावाच्या कॉम्युटरची मदत नसती तर मी हे काम कस करु शकलो असतो? माझ्या प्रत्येक पुस्तकात श्रेयनामावलीत बाबाच नाव आहे. पण त्यांचा स्वभाव कसा पाहा… मी संदर्भ मागितले तर ते हसत आणि सहज सांगणार… ‘ माननीय सचिव साहेबांच्या कानावर घालून ठेवा. कारण तुम्ही विधानमंडळाच्या बाहेरचे आहात. आमदार नाही, अधिकारी नाही..’ मी त्या-त्यावेळच्या प्रत्येक सचिवांना बाबांकडून संदर्भाची मदत घेतो सांगितल्यावर प्रत्येक सचिवाने एकच वाक्य उच्चारले… ‘बाबाशिवाय आणखी कोणाला माहिती असणार, जरुर घ्या’ मी प्रत्येक पुस्तकात बाबांच्यानंतर सचिवांचेही नाव शे्रयनामावलीत टाकले, असे हे बाबा. यांंच्यावरच्या गौरवगं्रथात आतापर्यंत १00 जणांचे लेख आलेत. त्यात दोन्ही सभागृहाचे आमदार आहेत, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, विधानमंडळाचे उपाध्यक्ष, अध्यक्ष आहे. विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती आहेत. अरुण गुजराथी आहेत, एकथा खडसे आहेत, हरिभाउ बागडे आहेत, नारायण राणे आहेत, माणिकराव ठाकरे आहेत, सुशील कुमार शिंदे आहेत, गणपतराव देशमुख आहेत, माजी सचिव अनंतराव कळसे आहेत आणि देशाच्या परराष्ट्र खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळेसुध्दा आहेत. यादी खूप मोठी आहे.
या लेखात बाबांचा गौरव आहेत. पण बाबाची धडपड नवीन आमदारांना वैधानिक कामाची माहिती करुन देण्याची त्यांची पध्दत अद्याक्षराप्रमाणे त्यांनी बनविलेल्या विषयांच्या अनेक सूची…. यामुळे या संंपूर्ण गौरव गं्रथात १00 जणांनी बाबांचा गौरव करताना १00 विशेषणे वापरली आणि ती नेमकी आहे. कोणी त्यांना चालते बोलते ग्रंथालय बोलले, कुणी त्यांना कर्मयोगी ग्रंथपाल म्हटले, एका पत्रकाराने त्यांना पत्रकार घडविणारी ज्ञानपोयी म्हटले. ज्या- आमदारांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार मिळाले त्या प्रत्येक आमदाराने त्यांच्या पुरस्काराचे श्रेय अगदी मुक्तपणाने बाबा वाघामारे यांना दिलं आहे.
स्व.आर.आर.पाटील म्हणजे सर्वांचे प्रिय आबा आणि हे बाबा…..या दोघांची घनिष्ट मैत्री कशी? असे अनेकांना त्यावेळी जाणवायचे. पण अनेकांना माहित नाही. कॉलेज जीवनात आबा आणि बाबा हॉस्टेलमध्ये एकत्र रहात होते. योगायोग असा की, १९८९ मध्ये बाबा विधानमंडळात ‘उपग्रंथपाल’ म्हणून सेवेत रुजू झाले आणि १९९0 साली आबा तासगावमधून विधानसभेत निवडून आले. आबांनी विधानमंडळ गाजवले. पण त्यांना माहिती पुरविण्याच्या मागे बाबा होते, हा तपशील माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या लेखात अगदी हळूच आलेला आहे. दळवी आबांचे सचिव होते, त्यामुळे बाबांना कोणी सेवाव्रती म्हटले, कोणी लोकप्रतिनिधींचा हक्काचा माणूस म्हटले अशा अनेक विशेषणांनी बाबांचा गौरव ग्रंथ सजलेला आहे. मुळात हे सगळे लेख एका व्यक्तिभोवती फिरत असले तरी, त्यातील माहिती वाचताना हजारो वाचकांच्या हृयापर्यंत ते भिडतील इतका त्यात ओलावा आहे.
आयुष्यात मोठी झालेली अनेक माणसे कष्टाने मोठी होतात हे खरेच आहे. काही नशिबाने होतात, काही परपरांगत श्रीमंतीमुळे मोठी होतात.
बाबा वाघमारे कष्टाने मोठे झाले. ‘कमवा आणि शिका’ या योजनेत कर्मवीर भाउरावांच्या रयतमध्ये ते शिकले. आबा आणि बाबांची मैत्री रयतपासूनची. ‘कमवा आणि शिका’ योजनेत या बाबांनी धान्य दळण्याच्या चक्कीत सहा-सहा तास काम केले. त्या अगोदर मिरज तालुक्यातील बेळंकीत शिक्षणासाठी ५-५ किलोमीटर पायपीट केली. एवढेच नव्हे तर जेव्हा एम.पी.एस.सी.ची परीक्षा पास होवून त्यांना त्याच संस्थेत गं्रथपालाची नोकरी मिळाल्याचे पत्र मिळाले तेव्हा ते पत्र ऐकण्याकरीता बेळंकीतल्या न शिकलेल्या लोकांनी बाबांच्या घरी गर्दी केली. महालक्ष्मी एक्सप्रेसने बाबा मुंबईला निघाले तेव्हा त्यांना निरोप द्यायला आर्धा बेळंकी गाव रेल्वे स्टेशनवर आला होता. मुंबईत कोणी नव्हते. त्यावेळच्या व्ही.टी.ला (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) उतरल्यावर तिथल्या स्नानगृहात आंघोळ करुन ते पहिल्या दिवशीच्या नोकरीवर हजर झाले आहेत. हे सगळ वाचत असताना एखाद्या कांदबरीचा भास व्हावा अशी ही सगळी ३५0 पाने आहेत. एम.पी.एस.सी.तून विधानभवनात उपगं्रथपाल म्हणून ते आले आणि सगळ्या विधानभवनाचे ते बाबा झाले. ५८ व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. पण विधानमंडळाला तातडीने एवढा कॉम्प्युुटर कुठून मिळावा? मग बाबांना ३ वर्षांची विशेष सेवा बहाल करण्यात आली. मंत्रालय असो किंवा विधानमंडळ असो. एखादी फाईल किती आणि कशी फिरते हे सगळ्यांना माहिती आहे. पण बाबांचा सेवा काळ वाढविण्याची फाईल ना त्यावेळचे अध्यक्ष नाना पटोले यांनी थांबवली, ना. राजे असूनही सामाजिक कामाची जाणीव असलेले रामराजे यांनी थांबवली… बाबा त्या सर्वांचे ॠणी आहेत.
पण महाराष्ट्राने बाबाचे ॠणी व्हायला पाहिजे. महाराष्ट्र विधानमंडळातील गेल्या ५0 वर्षातील अनेक उत्तम चर्चेमध्ये उत्तम संदर्भ पुरविण्याचे काम अगोदर अण्णा थोरात, मग गं्रथपाल चव्हाण साहेब आणि १९९५ पासून बाबा. या सर्वांनी विधानमंडळातील चर्चेचा दर्जा उत्तम राहण्याकरीता नेपथ्याचे जे काम केले, त्याला तोड नाही. महाराष्ट्र विधानमंडळाचे नाव देशात आहे. या महान परंपरेत त्या-त्यावेळचे सर्व अध्यक्ष, विधानपरिषद सभापती मग ते संतवाणी भारदे असोत, किंवा विद्वान पागे असोत. जयंतराव टिळक असोत, अरुण गुजराथी असोत आणि सर्व मुख्यमंत्री यांचे जसे श्रेय आहे त्याचप्रमाणे हा गोवर्धन उचलायला बाबाच्या संदर्भ टेकूची फार मोठी मदत झालेली आहे. यादृष्टीने विधानमंडळाच्या लौकिकात बाबांनी मोठी भर घातली आहे.
पण हे झाले शासकीय सेवेत असतानाच्या केलेल्या कामाचे. याच सेवेत असताना बाबांना गरीब समाजाचा, आपल्या बेळंकी गावाचा विसर पडला नाही. मुंबईत माणूस आला की तो मुंबईचा होतो, गाव विसरतो. कोणाला खरे वाटणार नाही. गेल्या ३0 वर्षांत विधानमंडळातील सेवा बजावत असताना बा.बा.वाघमारे या व्यक्तिनं शुक्रवारी रात्री महालक्ष्मी पकडून गाव गाठले. सोमवारी सकाळी ते मुंबई हजर व्हायचे आणि या काळात बेळंकी गावात बाबांनी उभी केलेली विद्यादीप इंग्रजी माध्यमाची शाळा, ज्युुनिअर कॉलेज.. एकदा बघून या. गाजावाजा न करता शासकीय सेवेतली माणसं किती मोठी लोकसेवक असू शकतात, ते पहायच असेल तर बेळंकीला चला. शाळेच्या एका कार्यक्रमाला बेळंकीला गेलो होतो. गं्रथालयातले बाबा अनेक वर्ष पाहिले. पण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना घडविणारे बाबा आणि त्यांची सामाजिक जाणीव मनात साठवली. बाबा किती मोठे आहेत हे मनोमन जाणवले. लांबून लहान दिसणारी माणसं मनाने किती मोठी, किती कर्तृत्ववान असू शकतात… माझीच मला लाज वाटली. मीही रोहा सोडून ६0 वर्षापूर्वी मुंबईला आलो. काही लिहीलं, काही लिहीतोय… पुस्तक झालं, भाषणं करतो, संपादक झालो… पण गावाकरीता काय केल? बाबा तुम्ही खूप मोठे आहात. लांबून मोठी वाटणारी माणसं जवळ गेल्यावर कधी कधी खूप छोटी आहेत असं जाणवतं. बाबा, तुम्ही लांबून लहान वाटत होतात, बेळंकीत आल्यावर तुमच मोठेपण कळलं आणि पुढच्या वर्षी आणखी धक्का बसला. घाटकोपरच्या गरीब वस्तीत बेळंकीच्याच विद्यादीप इंग्रजी माध्यमाच्या शाळेला तुम्हीच शासनाची परवानगी मिळवून दिलीत ती शाळाही पाहीली, ते कर्तृत्वही पाहिलं, त्यामुळे ‘थोरा-मोठयांच्या सहवासातले बाबा’ असं गौरवगं्रथाच नाव असताना मी त्यात दुरुस्ती करुन असं नाव सुचवतो. ‘थोरा-मोठयांच्या सहवासातले, तेवढ्याच मोठया मनाचे बाबा…’
गं्रथाचं संपादन करणारे मुख्य संपादक श्री. वि.दा.पिंगळे, त्यांंचे सर्व सहकारी आणि गौरव ग्रंथातील १00 लेखक यांंच्यामुळे विधानमंडळातील कर्तृत्व महाराष्ट्राला कळलं आहे. साहित्यिकदृष्ट्या या गौरव गं्रथाच विश्लेषण कसंही करा… .ज्याला सामाजिक जाणीव आहे, त्याच्यासाठी आणि उद्याच्या पिढीसाठी हा एक आदर्श गौरव ग्रंथ आहे. कसं घडायंच, कस लढायचं, कस हसायचं आणि मनातल दु:ख न सांगता कसं भलं दिसायचं या सगळ्या मानवी भावना या ग्रंथात आहेत, असं मी मानतो. म्हणून बाबा वाघमारे यांची केवळ साठी नव्हे, अमृतमहोत्सवी ७५ आणि शताब्दीसुध्दा नवीन पिढीला उर्जा देणारी ठरेल. तेव्हा मी असेन, नसेन…त्याने फरक पडत नाही. बाबा तुमचे काम असेच चालू ठेवा. कदाचित विधानमंडळातील सेवा आज किंवा उद्या संपेल. पण बेळंकीतील तुमची शाळा उद्याच्या महाराष्ट्राचे विद्यापीठ बनू शकेल. कदाचित तुम्ही त्या विद्यापीठाचे कुलगुरु असाल. माझ्या शुभेच्छा.–मधुकर भावे

error: Content is protected !!