ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामनोरंजन

कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अर्थ साहय देणार- आज निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत – 56,000 कलावंतांना रुपये 5 हजार प्रती कलाकार व प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील  847 संस्थांना मदत

मुंबई-कोरोनामुळे सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकारांची आर्थिक कुचंबणा झाली असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

देशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झाल्याने राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता, तसेच लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाटयगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने, व प्रयोगात्मक कला क्षेत्रातील संघटित व असंघटित विविध कला प्रकारातील कलाकार, ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे, त्यांची आर्थिक कुचंबणा झाल्याची बाब लक्षात घेता, त्यांना आर्थिक साह्य देण्याची मागणी शासनाच्या विचाराधीन होती. सदर मागणी विचारात घेऊन राज्यातील अशा प्रयोगात्मक कलांवर उदरनिर्वाह असलेल्या 56,000 एकल कलावंतांना रुपये 5 हजार प्रती कलाकार प्रमाणे रुपये  28 कोटी व प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील  847 संस्थांना रुपये 6 कोटी  असे एकूण रुपये 34 कोटी आर्थिक सहाय्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच स्थानिक लोककलावंतांची निवड प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रशासकीय खर्च रुपये 1 कोटी यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

या कलावंतांची निवड वृत्तपत्र व इतर माध्यमातून जाहिरातीव्दारे अर्ज मागवून विहित पध्दतीने करण्यात येईल. एकल कलावंत निवडीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समिती कलावंतांची निवड करेल. संस्थांची निवड सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या स्तरावरील समितीव्दारे करण्यात येईल. पात्र कलावंताच्या बॅंक खात्यात सदर रक्कम संचालक, सांस्कृतिक कार्य यांच्यामार्फत जमा करण्यात येईल.
—–०—–

error: Content is protected !!