राष्ट्रवादी व घड्याळ चिन्हांवरची सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज कोर्टात हे प्रकरण लिस्टेड होतं मात्र सुनावणी होऊ शकली नाही.
बुधवार सकाळी शरद पवार यांच्या बाजूने लवकर तारीख मिळण्यासाठी प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना पक्ष आणि घड्याळ चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतच्या सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी होणार होती. राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ चिन्हं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला दिल्याच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने सुप्रीम कोर्टाच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
विशेष म्हणजे नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरणाचीही याचवेळी सुनावणी होणार होती. मात्र आता या दोन्ही प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णयही विधानसभा अध्यक्षांना घेण्याचा आदेश दिला गेला होता. पण शरद पवार गट आणि ठाकरे गटाला विधानसभा अध्यक्षांचा निकाल मान्य नसल्याने त्यांनी संबंधित निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
हे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आता राज्यातील विधानसभा निवडणुका देखील जवळ आल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांआधी याचा निकाल लावणे सुप्रीम कोर्टासाठी महत्त्वाचे असणार आहे.
