अमित घावटे एन सी बी चे नवे झोनल डायरेक्टर
मुंबई बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन तपासामुळे चर्चेत आलेले आणि वादग्रस्त ठरलेले एसीबीचे समीर वानखेडे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी अमित घावटे यांची एनसीबी मुंबई विभागाचे नवे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो २०२० पासून चर्चेत आला. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात सिनेसृष्टीतील अनेक तारे, तारका, दिग्दर्शक आणि निर्माता यांची चौकशी झाली होती. त्यामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. कार्डेलिया क्रूझ छाप्यावरून समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. मात्र एनसीबीची ही कारवाईच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने विभागीय संचालक समीर वानखेडे वादग्रस्त ठरले. त्यामुळे त्यांची बदली झाली. आता त्यांच्या जागी अमित घावटे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर एनसीबीच्या अनेक प्रकरणांच्या तपासाचे मोठे आव्हान आहे.