ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका शाळेतील विध्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालोपयोगी वस्तू


मुंबई – महानगरापालिकेच्या शाळा गुरुवार, १५ जूनपासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालोपयोगी वस्तू सुमारे ९० टक्के शाळांमध्ये पोहोचल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी निम्मे शैक्षणिक वर्ष सरल्यानंतरही विद्यार्थ्यांना वस्तू मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले होते.
मुबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शालोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप करण्यात येते. यामध्ये शालेय पुस्तके, तसेच दप्तर, छत्री, बूट, रेनकोट, पाण्याची बाटली, पेन्सिल, वह्या, गणवेश, पेन यासह अन्य साहित्य दिले जाते. गेल्यावर्षी मुलांना हे साहित्य उशिरा मिळाले होते. अर्धे वर्ष उलटले तरी दप्तर, गणवेश मिळालेच नव्हते. त्यातच गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे शिक्षण विभागाचे नियोजन कोलमडले होते. त्यामुळे यंदा शिक्षण विभागाने शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी लवकर तयारी सुरू केली होती. यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. सर्व वस्तू शाळांमध्ये पोहोचल्या असून पहिल्याच दिवशी त्यांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी दिली.
महानगरपालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि उर्दू या आठ माध्यमांच्या शाळांमध्ये चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षी महानगरपालिकेच्या शाळेत एक लाख मुलांनी नव्याने प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे महानगरपालिकेचे नियोजन कोलमडले होते. तसेच गेल्यावर्षी दोन वर्षांच्या कालावधीसाठी नव्याने कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळेही वस्तू मिळण्यास वेळ लागला होता. यंदा तेच कंत्राट असून विद्यार्थ्यांच्या वाढीव संख्येनुसार वस्तूंचे परिमाण वाढवण्याची व खरेदी आदेश देण्याची प्रक्रियाही लवकर सुरू करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी शालेय वस्तूंचा पुरवठा वेळेत होणार आहे.
पालिकेच्या ९७३ प्राथमिक व २४३ माध्यमिक शाळा आहेत.या शाळांमध्ये चार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत

error: Content is protected !!