धक्कादायक- कल्याण, बदलापूर सारख्या शहरांमध्ये राहून थेट सातारा जिल्ह्यात ऑनलाईन वस्तू मागवून टोळीचा लाखोंचा गंडा
सातारा : चोरटे चोरीसाठी काय शक्कल लढवतील याचा काहीच भरोसा नाही. पण आता ऑनलाईन पद्धतीने चोरी करण्यातही चोर चांगलेच हुशार झाले आहेत. कराड शहरात ऑनलाईनद्वारे मोबाईल मागवून कुरिअर देणाऱ्याची हातचालाखीने फसवणूक करून मोबाईल चोरणाऱ्याचे प्रमाण वाढले होते. त्या चोरांना पकडण्याचे कराड पोलीसांसमोर आव्हान होते. त्यांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास करून विविध तपास कौशल्यांचा वापर केला. दरम्यान कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांनी संशयीतांचा शोध घेतला. अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर सारख्या शहरांमध्ये राहून थेट सातारा जिल्ह्यात ऑनलाईन वस्तू मागवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. चोरांची ही शक्कल जेव्हा पोलिसांना कळाली तेव्हा पोलीस देखील चक्रावून गेले.