लोकसभेत घुसलेल्या दोघांसह चौघांना अटक
लोकसभेच्या आत आणि बाहेर धुराचे लोट पसरवून घोषणाबाजी करणाऱ्या चार आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संसदेत आणि संसदेच्या बाहेर चार जणांनी धूर पसरवला, उड्या मारत घोषणाबाजी केली. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक चौकशी समिती तयार केली होती. त्यात संसदेच्या सुरक्षेत बाधा आणणाऱ्या एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. यातले दोन युवक हे लोकसभेच्या सभागृहात गेले होते. तिथे त्यांनी धूर पसरवला आणि घोषणाबाजी केली. तर एक महिला आणि एक पुरुष यांनी संसदेच्या बाहेर निदर्शनं केली आणि धूर पसरवला. या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या चार आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आलं. या सगळ्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिल्ली पोलिसांनी या सगळ्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. दिल्ली पोलिसांनी या आरोपींसाठी १५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. संसदेच्या सुरक्षेत बाधा आणण्यासाठी हे सगळे कारणीभूत ठरले होते. या प्रकरणात विक्की शर्मा आणि त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड ललित झा फरार आहे. मनोरंजन डी, सागर शर्मा, नीलम आजाद आणि अमोल शिंदे अशी चार आरोपींची नावं आहेत या सगळ्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.