ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रातील सहकार चळवळीला दिशा मिळेल


भाजपा विधानपरिषद गटनेते
आ. प्रविण दरेकरांना विश्वास

पुणे- ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे पुण्यात बॅंकिंग व साखर उद्योगासाठी दोन दिवसीय ‘सहकार महापरिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आज या महापरिषदेचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरही उपस्थित होते. या महापरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर यांनी शरद पवार आणि अमित शाह या दोन नेत्यांच्या संवादातून महाराष्ट्रातील सहकार चळवळीला दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सहकार चळवळीतील लोकांनी एकत्रित येऊन या चळवळीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहनही केले. दरम्यान, या महपरिषदेचा समारोप केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, सामाजिक कृषीबरोबर सहकार क्षेत्राला व्यासपीठ दिल्याबद्दल सकाळच अभिनंदन. सहकार क्षेत्रात अनेक अडचणी आहेत. महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे मोठे योगदान आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था ज्यावर उभी आहे त्यात सहकाराचे मोठे स्थान आहे. परंतु सरकार कुठलीही असो ही वस्तुस्थिती मान्य करायला लागेल ज्या पद्धतीने सहकाराला उर्जीतावस्था देण्याची गरज आहे, अधिक सक्षम बनविण्याची गरज आहे. त्यासाठी ज्या पद्धतीने खासगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाते तो दुर्दैवाने या ठिकाणी नाही याचा मला अनुभव आहे.

आज सहकारी, जिल्हा बँकांसमोर अनेक अडचणी आहेत. राज्यातील साडेचारशे, पावणे पाचशेच्या आतमध्ये बँका आहेत. परंतु बऱ्याच बँका अडचणीत आहेत. डबघाईला आल्या आहेत. एनपीए वाढला की आमच्यावर कारवाई सुरु होते. परंतु एखाद्या उद्योगपतीने एक-दोन हजार कोटीचे कर्ज थकवले तर मोठ्या बँकेने बजेटमध्ये प्रोव्हिजन करून एनपीएची तरतूद केली जाते. परंतु अर्बन को-ऑप.बँका, आमच्या छोट्या बँका एक-दोन लाखांचे गरिबांचे कर्ज थकलं तर राज्याच्या बजेटमध्ये अशा प्रकारची कुठलीच तरतूद नाही. हा विषय विधिमंडळात मी मांडला. त्याचा पाठपुरावाही करतोय. आम्ही अर्बन को-ऑप. बँकांमधून, जिल्हा बँकांतून स्वतःचा राज्य सहकारी बँकेने एकत्रितपणे फंडही उभा करू. ज्या अडचणीत बँका असतात त्यांना आम्ही काही निधी उभा करु, काही शासनाने निधी द्यावा, जर प्रारंभीक टप्प्यात त्या अडचणीत आहेत तेव्हा दोन-पाच कोटीची मदत केली तर बुडणाऱ्या बँका सर्वायू होऊ शकतात. नंतर त्या सुस्थितीत आल्यावर पुन्हा पैसे परतफेड करू शकतात अशा प्रकारची यंत्रणा करण्याची गरज आहे. कारण राज्यात जवळपास सहकारी चळवळीतील ५० टक्क्याहून अधिक बँका महाराष्ट्रातील आहेत. देशाच्या सहकार चळवळीचा मोठा भाग महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून अलीकडच्या काळात वेगवेगळ्या क्षेत्रातील संस्था कमी होताहेत. आर्थिक उलाढाल कमी होतेय. काही निवडक बँका आपल्या क्षमतेवर, मेहनतीवर पुढे जाताहेत, असेही दरेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मी केंद्राचे अभिनंदन करतो की देशात कधीच सहकार विषयाला स्वतंत्र खाते नव्हते. कृषिच्या अंतर्गत सहकार असायचा. परंतु पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी सहकारचे स्वतंत्र खाते निर्माण केले. केवळ खाते निर्माण केले नाहीतर अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या जबाबदार नेत्यांनी स्वतःकडे ते खाते घेतले. त्यामुळे देशपातळीवर या विषयाला महत्व आले आहे. सहकारचे धोरण निश्चित केले. सहकारातून समृद्धी झाली पाहिजे, पाळमूळ ग्रामीण भागात मजबूत झाली पाहिजेत, आर्थिक विकासात सहकारचे योगदान पाहिजे ही बेसिक संकल्पना घेऊन केंद्र पातळीवर सहकाराचे धोरण आले आहे. केंद्र-राज्य सरकार मिळून हा महाराष्ट्र सक्षम, सशक्त करण्याची गरज आहे. या चळवळीला अलीकडच्या काळात शरद पवार यांचे योगदान राहिलेले आहे. त्यांना यातील बारकावे, ताकद माहित आहे. ते निश्चितच या क्षेत्राला आशीर्वाद सातत्याने देत असतात. मीही मुंबईत अर्बन बँकांची अशाच प्रकारे परिषद घेतली. ७०-८० बँका होत्या. त्या डबघाईला येण्याची कारणे काय?, त्यांना उर्जीतावस्था आणण्यासाठी काय केले पाहिजे यावर मंथन करण्यात आल्याचे दरेकरांनी म्हटले. तसेच सहकार चळवळीतील सर्व लोकांनी एकत्रित येऊन या चळवळीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केला पाहिजे. सहकार चळवळीला शरद पवार आणि अमित शहा यांच्या चर्चेतून दिशा मिळेल, असा विश्वासही यावेळी दरेकर यांनी व्यक्त केला.

फोटो ओळ

‘सहकार महपरिषदे’त सहकार क्षेत्रातील आव्हानांबाबत मार्गदर्शन करताना आ. प्रविण दरेकर दिसत आहेत.


error: Content is protected !!