जळगावच्या अमळनेर मध्ये कोट्यवधींचा शिक्षक भारती घोटाळा
जळगाव : जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थांच्या शाळांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शिक्षक, शालेय कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिक्षण विभागाकडे केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेकायदेशीपणे शिक्षकांची भरती, विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रकार या तक्रारीतून समोर आला आहे. अनेक संस्थाचालक, कर्मचारी तसेच शिक्षकांची फसवणूक झाल्याचा आरोपही या कर्मचारी आणि संस्था चालकांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांच्यासह फसवणूक झालेल्या शिक्षक आणि संस्थाचालकांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
संम्बंधित भ्रष्टाचाराबाबत शिक्षण विभाग उपसंचालकांकडे तक्रार करण्यात आली असून 20 जून रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. शिक्षण विभागकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे निवृत्त न्यायाधीशामार्फत प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी तक्रारीतून केली आहे.
अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा पाडसे यासह वेगवेगळ्या संस्थांच्या सहा ते सात शाळांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार तसेच अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुठलीही मान्यता नसताना शाळेच्या तुकड्या वाढवणे, शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती करणे, तसेच विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे अनुदान लाटणे, संस्थाचालकांच्या खोट्या संचचा वापर करून अशा पद्धतीने कोटयावधी रुपयांचा अपहार होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.याप्रकरणी रामकृष्ण पाटील यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली आहे. मात्र, ४ महिन्यांपासून तक्रारींचा पाठपुरावा सुरू असून देखील कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे निवृत्त न्यायाधीश यांच्यामार्फत संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे तसेच दोशींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान , संस्था चालवण्याच्या नावाखाली मुक्तद्वार क्रीडा बहुद्देशीय संस्था जळगाव या संस्थेचे अध्यक्ष शरद देवराम शिंदे नामक व्यक्तीकडून शिक्षक आणि संस्थाचालक यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणात कशा पद्धतीने फसवणूक केली जात आहे, याबाबत स्वतः शिक्षक व संस्थाचालकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. संबंधित गैर व्यवहारात जळगावच्या शिक्षणाधिकारीपासून ते मंत्रालयापर्यंत सर्व साखळी आहे. त्यामुळेच. अर्थपूर्ण व्यवहारातून कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या सगळ्या प्रकारबाबत आपल्याकडे काही शिक्षक तोंडी तक्रार घेऊन आले होते. त्यांच्या या तकारारीची दखल घेत आपण शिक्षण मंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार आहोत. यातील कोणाचीही हय-गय केली जाणार नसल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे