लाडक्या बहिणी पाठोपाठ लाडक्या भावनाही सरकारकडून मोठ्या मदतीची घोषणा
.सोलापूर : पंढरीच्या आषाढी वारीचा उत्सव अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचला असून उद्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पंढरीच्या पांडुरंगाची शासकीय महापूजा होणार आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण कुटुंब आज पंढरीत दाखल झाले असून येथील विविध कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी होत आहेत. येथील कृषी पंढरी २०२४ प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभातून बोलताना मुख्यमंत्र्यांनी उशिरा येण्याचं कारण सांगितलं. राम कृष्ण हरी, बोला पुंडलिका वरद हरी श्री ज्ञानदेव तुकाराम … असे म्हणत भाषणाला सुरुवात केली. तसेच, पंढरपूरच्या वारीसाठी येणाऱ्या बसला अपघात झाल्यामुळे, मी डोंबिवलीत जाऊन अपघातातील जखमींची भेट घेऊन आलो. तसेच, डॉक्टरांना सूचनाही केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत लाडक्या भावांसाठीही योजना असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून लाडकी बहीण योजनेचा दाखला देत महिलांसाठी आपण योजना सुरू केल्याचं सांगितलं. लवकरच माझ्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये दरमहाप्रमाणे पैसे जमा होतील. तसेच, काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं, पण लाडक्या भावाचं काय? त्याचं काय तर, त्यांच्यासाठीही आम्ही योजना सुरू केली आहे. त्यानुसार, आता बारावी पास झालाय त्याला ६ हजार, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार आणि डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजार रुपये महिन्याला स्टायफंड देणार आहोत. त्यामध्ये, वर्षभर तो भाऊ कंपनीत काम करेल, त्याला अप्रेंटीस म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. त्या कंपनीत तो ट्र्रेन होईल. अप्रेंटीशीपचे पैसे सरकार भरणार आहे, इतिहासात पहिल्यांदाच अशी योजना सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातून सांगितले.
उद्योग, कारखाने आणि कंपन्यांत हे युवक अॅप्रेटिशीप करतील आणि त्यांना महिन्याला भत्ता सरकार देणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच, मुलींसाठी 100 टक्के मोफत उच्च शिक्षणाची सोय आपण केली आहे. शेतकऱ्यांसाठीही विविध योजना सरकारच्या माध्यमातून होत आहेत हे सांगत हे सरकार सर्वसामान्यांचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.