मराठा उद्योजकांनी केली वारकऱ्यांची चरण सेवा
मुंबईः आषाढी वारीत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत असतात. मराठा उद्योजक लॅाबी या मराठा समाजातील उद्योजकांच्या संघटनेने वारकऱ्यांची चरण सेवा केली.
आळंदी ते पंढरपूर १५-२० दिवस शेकडो किमी अंतर चालत पायवारी करणाऱ्या वारकऱ्यांना पायांच्या असह्य
वेदना सहन कराव्या लागतात. या वेदनेतून त्यांना आराम मिळावा म्हणून मराठा उद्योजक लॉबीतर्फे वारकऱ्यांची चरण सेवा करण्याचा उपक्रम गेली अनेक वर्षे राबविला जातोय.
मराठा उद्योजक लॉबीचे डॉ. प्रमोद आमृळे यांनी पुढाकार घेत १८+ आयुर्वेदिक औषधांनी तयार केलेले वातहर तेल बनविले आहे. या तेलाने लॅाबीतील उद्योजकांनी वारकऱ्यांच्या पायांची मालिश केली. याला वारकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आपले आशीर्वाद दिले.
पायांची मालीश, अग्निकर्म, विधकर्म अशा विविध सेवा दिल्या गेल्या. या सेवा देताना मराठा उद्योजक लॉबीच्या ५००+ दिनदर्शिकेचे वितरणही करण्यात आले.
“माझा पाय चालत येत असताना मुडपल्यामुळे दुखत होता. अनेक डॉक्टरांना दाखवले पण त्यांनी x-ray करायला सांगितले होते. डॉ. आमृळे यांनी माझा पाय बरा करून दिला. त्यांच्या रुपात पांडुरंग अवतरला,” अशी प्रतिक्रिया एका वारकरी महिलेने प्रतिक्रिया दिली.
या सेवाकार्यात मराठा उद्योजक लॉबीचे प्रदेशाध्यक्ष वैभव फरतडे, मुंबई व कोकण संपर्क प्रमुख कृषिराज चव्हाण, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिनेश चासकर व श्रीकांत आमले, सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत आहेर, नवी मुंबई सोशल मीडिया प्रमुख प्रेम साळुंखे, कळंबोली समूह प्रशासक डॉ. प्रमोद आमृळे आणि ओमकार जाधव यांचा समावेश होता.