ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीयविश्लेषण

नव्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार लाभणारे “गुरुजी” पुस्तकाचे धन..!

राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले “गुरुजी”नावाचे संग्राह्य पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि व्यासंगी पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिले आहे.
इंटरनेटच्या जगात पुस्तक वाचून संस्कृती संपत चाललेली असतांना आणि त्यामध्ये सध्या लॉकडाऊनच्या काळात एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे धाडसाचे कार्य असतांना,योगेश त्रिवेदी अर्थात गुरुजींनी आठवणींचा प्रचंड खजिना ह्या पुस्तक रुपी तरुण पिढीच्या हातात दिला आहे.
योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपली पत्रकारिता आपले वडील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकारितेतील दीनदलित, शोषितांच्या बाजूने लेखन करणारे ज्येष्ठ पत्रकार दिवंगत वसंतराव त्रिवेदी यांनी महाराष्ट्र माऊली पूज्य सानेगुरुजी यांच्या पुण्यतिथी दिनी ११ जून १९६६ रोजी सुरु केलेल्या साप्ताहिक “आहुति” पासून प्रारंभ केला. तेंव्हा पासून नवशक्ती, सकाळ, सामना आदी दैनिकांत त्यांनी पत्रकारिता केली. कष्टाळू वृत्ती, बोलका स्वभाव, दांडगा जनसंपर्क, आणि परोपकारी वृत्ती, यातून गेली पन्नास वर्षे त्यांनी आपली वृत्तपत्रसृष्टीत निष्कलंक घालवली आहेत. याचा बोध नव्या पिढीला घेण्यासारखा आहे. योगेश त्रिवेदी म्हणजे शिवसेनेचे चालता-बोलता ज्ञानपीठ होय. शिवसेनेच्या जडणघडणीपासून ते आजमितीपर्यंत सर्व घडामोडींची माहिती त्यांच्या पोतडीत आहे.
यापूर्वी त्यांचे “पासष्टयन” हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच दुसरे “गुरुजी” नांवाचे पुस्तक लिहून महाराष्ट्रातील राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांच्या हाती मौल्यवान खजिना भेट म्हणून दिला आहे. हे पुस्तक निश्चितच बुद्धीला ज्ञान व विचारांची मशागत करणारे राहील.
या पुस्तकामध्ये स्वतंत्र भारतापासून आता पर्यंतचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे पहिले मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद विरोधी पक्षनेते, विधानसभा विरोधी पक्षनेते, यांचा कार्यकाळ तारखांसह प्रसिध्द केला आहे. यामध्ये ब्रिटीश भारताच्या बॉम्बे प्रेसिंडेन्सीच्या राज्यपालांच्या यादीचाही समावेश आहे.
भारतीय राज्यघटना निर्मितीचा समग्र इतिहास, १९९८ सालची निळाई शेवटची कशी ठरली, मंत्रालयाला दिवाकर रावते यांनी मिळवून दिलेला “पत्ता”, तीनही राष्ट्रपती राजवटीचे साक्षीदार असलेले शरदचंद्र पवार, यशवंतराव चव्हाण यांच्या पासून असलेली पक्षांतराची परंपरा, माजी मुख्यमंत्री डॉ.मनोहर जोशी यांनी “कमळा”वर लढविलेली लोकसभेची निवडणूक, राज्य घटना मंजुरीनंतर १९५२ सालानंतरची राज्यातील निवडणूक असे अनेक बारीक-सारीक संदर्भ आणि तपशील देवून लिहिलेल्या या पुस्तकात राजकीय किस्से आणि विवेचनात्मक राजकीय मजकूर वाचनीय आहे.
उदय पै यांनी तयार केलेले अतिशय सुंदर आणि आकर्षक मुखपृष्ठ असलेले “गुरुजी” हे पुस्तक विशेषतः वृत्तपत्रसृष्टीत काम करणाऱ्या संपादकीय विभागाला प्रेरणादायी ठरणारे आहे. “पुस्तक हेच धन, पुस्तक हेच गुरू”..! या संदेशाप्रमाणे ‘गुरुजी’ पुस्तक हे बरंच काही सांगून जाते. आपल्या पत्रकारितेतील महत्वपूर्ण रौप्यमहोत्सवी कारकीर्द हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली यशस्वीपणे ‘सामना’ मध्ये पूर्ण करणाऱ्या योगेश वसंत त्रिवेदी यांच्या साठी बाळासाहेब ठाकरे हे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे ‘गुरुजी’ हे पुस्तक शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या शुभहस्ते शिवतीर्थावर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर अर्पण करण्याचे औचित्य योगेश त्रिवेदी हेच दाखवू शकतात. इतकेच नव्हे तर जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाददादा पै यांच्या हस्ते आध्यात्मिक, कौटुंबिक वातावरणात मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन करुन राजकारण भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी जीवनविद्या मिशनच्या, ‘सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर’ हे तत्त्वज्ञान उपयोगी असल्याचे प्रकर्षाने दाखवून दिले. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि योगेश त्रिवेदी ही जोडी पत्रकारितेत अर्धशतकाहून अधिक काळ एकत्र फिरताना दिसते. त्यामुळे ओघानेच विजय वैद्य यांचे बहुमोल सहकार्य योगेश त्रिवेदी यांच्या पुस्तकांसाठी मिळाले, हा त्यांना प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाल्याचे ते कृतज्ञतापूर्वक मान्य करतात. या पुस्तकाची प्रत कोणाला हवी असल्यास निश्चित या पुस्तकाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांच्याशी संपर्क करू शकता. संपर्क नंबर- 989293532/ 8369974573 (गुरुजी- स्वागतमूल्य ₹ 200/-)
-खंडूराज गायकवाड, 9819059335.

error: Content is protected !!