डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरु रुग्णांचे हाल होणार
मुंबई -कोल्क्त्याम्ध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने २४ तासांचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशातील सर्व रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा शनिवार सकाळी ६ ते रविवार सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहेत
कोलकत्यामधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या निमित्ताने डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर चार दिवसांपासून संपावर असून, आता इंडियन मेडिकल असोसिएशननेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित संप पुकारला आहे. देशभरातील डॉक्टर शनिवारी संपावर जाणार असून, अत्यावश्यक वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) मुख्यालयाने याबाबत पत्र काढले आहे. त्यात असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. व्ही. अशोकन आणि मानद सचिव डॉ. अनिलकुमार नायक यांनी कोलकत्यातील घटनेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कोलकत्यातील घटनेचा तपास योग्य रीतीने करण्यात आला नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. कोलकत्यातील रुग्णालयावरही हल्ला करण्यात आला असून, त्यात पुरावे नष्ट झाले असण्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.डॉक्टरांवरील हल्ले वाढले असून, महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील आधुनिक वैद्यक पद्धतींचा अवलंब करणारे डॉक्टर शनिवारी (ता. १७) पहाटे ६ ते रविवारी (ता. १८) पहाटे ६ वाजेपर्यंत संपावर असतील. या कालावधीत डॉक्टर बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवतील. याच वेळी अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे सुरू राहतील, असे असोसिएशनने नमूद केले आहे.