‘क्रिप्टो करन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?
गेल्या सप्ताहात अमेरिकेतील
‘एफटीएक्स ‘ नावाचा आभासी चलनाचा म्हणजे क्रिप्टो करन्सी चे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उध्वस्त झाला. एफटीएक्स ने दिवाळे जाहीर केले. लाखो गुंतवणूकदारांच्या आभासी चलनातील गुंतवणूकीची माती झाली. जगभर खळबळ माजली. मात्र या घटनेनंतर तरी आभासी चलनाच्या मृगजळामागे धावणारा भारतीय गुंतवणूकदार, त्याचे देशातील नियंत्रक जागे होतात किंवा कसे हे पहाणे महत्वाचे आहे. त्याचा हा धांडोळा.
जगभरात गेल्या काही वर्षात क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलनातील गुंतवणूकीचा मोठा बोलबाला सुरु आहे . आजची तरुण पिढी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मंडळी गुंतवणूकीचा नवा पर्याय म्हणून त्याच्याच प्रेमात पडलेली आहेत. टीव्ही वर त्यांच्या जाहिरातीचा सतत मारा सुरु असतोच. इथेरियम, बिट कॉइन, डीजीकॉईन, इ. विविध नावांनी भारतासह अनेक देशांत विविध नावांच्या क्रिप्टो करन्सी जगभर अस्तित्वात आहेत. ‘क्रिप्टो ‘ हे मुळातच आभासी चलन. काही प्रगत देशांची त्याला मान्यता तर भारता सारख्या देशाची त्याबाबत खूप सावध भूमिका. ही करन्सी जगभर अकाळ विक्राळ स्वरूप धारण करीत आहे. क्रिप्टो करन्सी ही महा शक्तिशाली संगणकाद्वारे ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून आभासी स्वरूपात निर्माण केली जाते. म्हणजे ती प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. हा आभास निर्माण करण्यासाठी प्रचंड माहिती, , वीज वापर केला जातो. त्याचे खरेदी विक्री करणारे ऑनलाईन बाजार भारतासह जगभर आहेत. एफटीएक्स हा तशांपैकी एक बाजार. आपल्या उत्पन्नातील काही रक्कम बचत करून त्याची गुंतवणूक बँकांच्या ठेवी, शेअर्स, कर्ज रोखे, सोने चांदी, जमीन स्थावर मिळकत, यांच्याप्रमाणे या आभासी चलनात सर्व देशांमध्ये गुंतवणूक केली जात आहे. मात्र हे खरंच एक मृगजळ आहे. संगणक तंत्रज्ञानाने दिलेली ‘आभासी ‘ भेट आहे. मात्र त्यातून आपण शहाणी मंडळी काही धडा घेऊन शिकणार किंवा कसे हे पहाणे महत्वाचे ठरावे.
.
अमेरिकेत गेल्या सप्ताहात घडलेल्या एका घटनेमुळे या क्रिप्टो चे म्हणजे आभासी चलनाचे जग हादरले आहे. या क्रिप्टो चे व्यवहार करणारा तेथील ‘एफटीएक्स ‘ हा सर्वात मोठा व्यवहार करणारा बाजार. त्याचे मध्यवर्ती कार्यालय बहामा येथे. गेल्या सप्ताहात हा बाजार बंद पडला. बाजाराच्या प्रवर्तकांनी म्हणजे सॅम बँकमन फ्राईड ने दिवाळखोरी जाहीर केली. गुंतवणूकदारांची क्रिप्टोतील कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक मातीमोल झाली. या घडामोडींमुळे आभासी चलनाचे धिंडवडे जगासमोर येत आहेत.या घटनेचा खूप मोठा धक्का जगातील सर्व क्रिप्टो गुंतवणूकदारांना बसला असून काहीं तज्ञांच्या मते या आभासी चलनाची स्वविनाशाकडे वाटचाल सुरू झाली आहे. .
एका ३० वर्षे वयाच्या सॅमने एफटीएक्स उभारले. त्याला क्रिप्टो विझ किड म्हणजे अद्भूत आभासी बालक पदवी दिली गेली. त्याने इतक्या छोट्या वयात ई फायनान्स क्षेत्रात क्रांती केल्याचे बोलले गेले. भल्या भल्या धुरिणांना त्याची भूरळ पडली. त्याने या बाजाराचे मोठे साम्राज्य उभे केले पण ते पत्त्याच्या बंगल्या सारखे तकलादू आहे हे ते कोसळल्यानंतरच लक्षात आले. त्याने या बाजारात व्यवहार करणाऱ्याना भरपूर लालूच दाखवली, सवलती दिल्या. या सॅमने अलामेडा रिसर्च नावाची दुसरी कंपनी उभारली. त्याच्या सुमारे 130 कंपन्या आहेत. त्यात काही तरुण भारतीय बुद्धिमान तंत्रज्ञ आहेत. त्या कंपनीला एफटीएवस मधून कर्ज दिले. त्यासाठी सुरक्षा म्हणून एफटीएक्सचेच आभासी चलन तारण ठेवले. आयजीच्या जिवावर बायजी उदार या नात्याने. गुंतवणूकदारांना त्याचा वास लागला. मग गुंतवणूकदार बाहेर पडण्यासाठी धावले. त्याचे पर्यवसान या बाजाराचे दिवाळे निघण्यात झाले. सॅम ने माफी मागितली. पण त्याचा काय उपयोग ?.
अलीकडेच टेसला कंपनीच्या एलॉन मस्कने प्रचंड रक्कम देऊन खरेदी केलेल्या ट्विटर ची वाट लावण्यास प्रारंभ केला. दुसरीकडे फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग हा मालक त्यांचीच ‘री” ओढत आहे. सॅम च्या कृत्यामुळे आभासी चलनाचे विश्व डळमळीत झाले आहे. त्याला कोणताही कायदा नाही. कोणी जबाबदार नाही. कोठेही लिखापढी नाही. सारेच आभासी मात्र गुंतवणूकदारांना घातलेला गंडा मात्र खरा. गुंतवणूकदारांची माती करणारा. त्याला वाचवण्याचे प्रयत्न बायनान्स या दुसऱ्या प्रतिस्पर्धी बाजाराने केले. पण त्यांनी या बुडत्या जहाजाची गळती पाहिल्यावर काढता पाय घेतला.
खरं तर या घडामोडी मुळे या आभासी चलनाची विश्वासार्हता धोक्यात निश्चित आलेली आहे. मुळातच संगणकाच्या माध्यमातून असित्वात आलेल्या याआभासी चलनाबाबत गुंतवणूकदार वर्गात साशंकता आहे. त्याची कोठेही लिखीत नोंद नाही. कोणी गुंतवणूक केली किंवा विक्री केली हे कोणालाही कळत नाही. त्याचा भाव मात्र सतत वर खाली होत असतो. तरीही गेल्या काही वर्षात या मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांनी वेळीच जागे होणे महत्वाचे. अशा घटना यापुढे होतच रहाणार.
भारतातही रिझर्व्ह बँकेने या आभासी चलनाला म्हणजे क्रिप्टो करन्सीला मान्यता दिलेली नाही. आपल्याकडे क्रिप्टो करन्सीच्या जहिराती, प्रसार, व्यवहार राजरोस सुरु आहेत. भारतीय शेअर बाजार, सोनेचांदी बाजार, कमोडिटी बाजार यांना सेबी सारखे नियंत्रक आहेत. मात्र क्रिप्टो करन्सीला नियंत्रक नाही. रिझर्व्ह बँकच ती भूमिका पार पाडत आहे. केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांनी एफटीएक्स च्या दिवाळ्यातून योग्य तो धडा घेऊन भारतात या आभासी चलनाचे कडक व योग्य ते नियंत्रण करण्याची हीच वेळ आहे. त्यातील नफ्यावर जबरी प्राप्तीकर लावलेला आहे. मात्र हे नियंत्रण पुरेसे नाही. . त्यासाठी प्रागतिक तंत्रज्ञान धोरण, त्याची भक्कम कायदेशीर चौकट निर्माण केली पाहिजे.
आपल्या देशाला आर्थिक गैरव्यवहारांची मोठी राजकीय परंपरा आहे. शेअर बाजारातही अनेक घोटाळे, गैरव्यवहार झाले. प्रत्येक वेळी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फटके बसले . या आभासी चलनाच्या बाबतीतही काही घोटाळे, गैरव्यवहार होऊ नये यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेने सक्रीय व्हावे एवढीच माफक अपेक्षा…. क्रिप्टो चे आणखी फटके बसण्यापेक्षा आपण सर्वांनीच वेळीच जागे होणे आवश्यक आहे…( प्रा. नंदकुमार काकिर्डे)