मागाठाणे येथील झोपडपट्टीवासियांकडू न-लाखोंची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करणार
आ. दरेकरांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर
मुंबई – विधानपरिषदेत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मागाठाणे येथे झोपडपट्टीचा सर्व्हे करताना कर्मचारी लोकांकडून पैशांची मागणी करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी केली. दरेकर यांच्या मागणीला मंत्री शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक उत्तर दिले.
यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, जाणूपाडा पांडे कंपाउंड चिखलवाडी, मागाठाणे येथे बायोमॅट्रिक झोपडपट्टीचा सर्व्हे सुरु आहे. त्या ठिकाणी सर्व्हे करताना कर्मचारी लोकांकडे ३० ते ४० लाख रुपयांची मागणी करताहेत. त्यांना सरकार बदलले आहे याची जाणीव करून देण्याची गरज आहे. हे लोकं कोण आहेत त्याची ताबडतोब माहिती शासनाने घ्यावी आणि कारवाई करून लोकांचे घेतलेले पैसे परत गेले पाहिजेत असा संदेश सरकारकडून जाण्याची गरज असल्याचे दरेकर यांनी म्हटले. त्यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले की, याप्रकरणी संबंधित यंत्रणेला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. अशा पद्धतीने सर्वसामान्य माणसांना कुणी नाहक वेठीस धरत असेल तर चौकशी करून कारवाई केली जाईल.