कोल्हापूर जिल्ह्यात १६३ कलम लागू – वादग्रस्त पोस्ट,वॉट्सअप मेसेज ट्विटर बॅनर्स होर्डिंगला मनाई
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेचे दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू केलं आहे. यानुसार १७ जुलै दुपारी दोन वाजल्यापासून कोणत्याही व्यक्तीस इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमाद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश पाठविणे, खोटी माहिती पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे आणि कोल्हापूर जिल्हा हद्दीमध्ये वरील विषयाच्या अनुषंगाने व समाजात तेढ निर्माण होईल असे बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग प्रदर्शित करणेस मनाई करण्यात आली आहे.
किल्ले विशाळगड अनाधिकृत अतिक्रमणाबाबत तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करून सामाजिक अस्थिरता, तसेच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कलम १६३ जारी करण्यात आलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी १४ जुलै गजापुरात प्रचंड हिंसाचार झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नासधुस करण्यात आली होती. मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने घोषणाबाजी करत अचानक दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करुन नुकसान केले होते