ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
विश्लेषण

बाबासाहेब पुरंदरे : अगणितांचा आधारवड ! –

श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या वयाच्या बरोब्बर शंभराव्या वर्षी देह ठेवला आणि छत्रपती शिवरायांच्या शिवस्रुष्टीत प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे उभ्या हिंदुस्थानातच नव्हे तर साऱ्या जगभरात पारायण केले. घरोघरी शिवरायांचे शौर्य, शिवनीति, शिवविचार, शिवचरित्र पोहोचविले. महाराष्ट्रात शिवसृष्टी उभी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. बाबासाहेब अक्षरशः शिवकाळ जगले. स्वतः बरोबरच शिवभक्तांना शिवकाळात घेऊन गेले.
‘जाणता राजा’ हे महानाट्य बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने तयार केले त्याला संपूर्ण नाट्यसृष्टीत तोड नाही. मुंबई, महाराष्ट्राबरोबर संपूर्ण हिंदुस्थानात ‘जाणता राजा’ पोहोचविण्याचा बाबासाहेबांचा मनसुबा होता. त्यात ते बव्हंशी यशस्वी झाले. नुकतेच बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या यशस्वी जीवनाचे शतक गाठले. ९९ वर्षे पूर्ण करुन शंभराव्या वर्षांत त्यांनी पदार्पण केले. गेल्या दोन वर्षांत बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवपरिवाराची जणू काही मांदियाळी शिवचरणी लीन झाली. पत्नी निर्मलादेवी, बाबासाहेबांची सावली प्रतापराव टिपरे, जाणता राजा मधील आई भवानी मातेचे पुजारी दत्तात्रय चिंतामण हाडप उर्फ दादा हाडप गुरुजी, पदमश्री सदाशिव गोरक्षकर, जागतिक दर्जाचे शिल्पकार सदाशिवराव साठे, शिवकालीन शस्त्रसंग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव आणि आता स्वतः बाबासाहेब शिवचरणी लीन झाले.
१७ नोव्हेंबर २०१२ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महानिर्वाण झाले. म्हणजे बाळासाहेबांपासून बाबासाहेबांपर्यंत सारी शिवमय झालेली मंडळी शिवरायांच्या स्वर्ग रुपी दरबारात पोहोचली. बाबासाहेब शंभर वर्षात अगणितांचे, असंख्यांचे, अनेकांचे ‘आधारवड’ बनले. अनेकांना त्यांनी आधार दिला. बाबाहेबांच्या ठायी पराकोटीची सहनशीलता होती. आपण ती पाहिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार महाराष्ट्र शासनाने सन्मानाने दिला. पण त्यातही काही नतद्रष्टांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ किताब देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यावर टोकाची, खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचा प्रयत्न काहींनी केला. पण बाबासाहेब पुरंदरे यांनी, शांत, संयमी, धीरोदात्त स्वभावाने त्यांनी ती टीका सहन केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद निर्माण झाला होता. तिथी, तारीख, असा घोळ होता. दोन दोन तीन तीन वेळा शिवजयंती साजरी करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी सहजपणे सांगितले की, महाराजांची जयंती रोज साजरी करायला काय हरकत आहे ? त्यायोगे महाराजांचे रोज स्मरण केले जाईल.
माझे लहान बंधू आणि आहुतिचे संपादक श्री. गिरीश वसंत त्रिवेदी यांचे बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत जिव्हाळ्याचे संबंध. तसा बाबासाहेब आणि अंबरनाथ, आहुति चा घनिष्ठ संबंध. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बाबासाहेब पुरंदरे यांनी तयार केलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्यात भवानी मातेची भव्य प्रतिमा आणि या भवानी मातेचे पुजारी दादा हाडप, या महानाट्यातील मावळ्यांची भूमिका करणारे संजय दलाल तसेच अशोक दलाल आणि नंदकुमार दलाल हे दोन्ही माझे शाळकरी मित्र अंबरनाथचेच. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांचे अंबरनाथ येथे वरचेवर येणे असायचे. वसंतराव त्रिवेदी आणि शिवगर्जना साप्ताहिकाचे माजी संपादक वसंतराव मेहेंदळे यांचेही बाबासाहेब यांच्या बरोबर चांगले संबंध. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते १९९४ मध्ये ‘आहुति’चा शिवमंदिर विशेषांक प्रकाशित करण्यात आला. मातोश्रीवर हा प्रकाशन सोहोळा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पुढाकाराने झाला आणि धर्मवीर आनंद दिघे, शशीकला रेवणकर, गंगाधर मुळे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. पोथीच्या स्वरुपात प्रकाशित करण्यात आलेल्या या अंकाची बाळासाहेब ठाकरे यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. असाच परंतु आणखीही परिपूर्ण माहिती घेऊन २००९ मध्ये अंबरनाथ च्या प्राचीन शिवमंदिरावर पोथीच्या आकारात ‘आहुति’चा दुसरा शिवमंदिर विशेषांक गिरीश त्रिवेदी यांनी प्रकाशित करायचे ठरविले. अंकाची छपाई पूर्ण होत आली आणि या विशेषांकाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभहस्ते करण्याचे संपादक गिरीश त्रिवेदी यांनी निश्चित केले. त्याप्रमाणे पुणे येथे जाऊन गिरीश त्रिवेदी यांनी दस्तुरखुद्द बाबासाहेबांची भेट घेतली. तेंव्हा “अहो, गिरीशराव पाहुणे म्हणून कुणाला बोलवायचे हे तुम्ही माझ्यावर सोपवा. तुम्ही कार्यक्रमाच्या तयारीला लागा.” असा आदेशच जणू बाबासाहेबांनी दिला. अंबरनाथ येथे कार्यक्रम ठरला. बाबासाहेबांनी इतिहास, पुरातत्व संदर्भातील अभ्यासक गोरक्षनाथ देगलूरकर, पद्मश्री डॉ. सदाशिवराव गोरक्षकर, शिल्पकार सदाशिव साठे यांच्या समवेत प्रकाशन करण्यासाठी पुढाकार घेतला. इतकेच नव्हे तर “मी तुम्हाला सांगतोय, आमंत्रण वेगळे येणार नाही. तुम्हाला यायचंय”, असेच बाबासाहेबांनी या मान्यवरांना स्पष्ट सांगितले आणि बाबासाहेब या सर्वांना घेऊन अंबरनाथ येथे आले. २२ ऑगस्ट २००९ रोजी झालेल्या या प्रकाशन समारंभाच्या दोन महिन्यापूर्वी एका कार्यक्रमात बाबासाहेबांनी या बद्दलची उद्घोषणाही केली होती. ‘आहुति’च्या विशेषांक प्रकाशन समारंभाच्या दिवशी पुरातत्व खात्याने नवी दिल्ली येथे एक बैठक लावली होती. परंतु सदाशिवराव गोरक्षकर यांनी शिवमंदिर विशेषांक प्रकाशन समारंभ असल्याने या बैठकीला येऊ शकत नसल्याचे कळविले. संबंधितांनी ती बैठकच रद्द केली. नंतर सदाशिवराव गोरक्षकर यांनी आहुतिच्या शिवमंदिर विशेषांकाचे सादरीकरण नवी दिल्ली येथे खास बैठकीत केले.
हा महिमा बाबासाहेब पुरंदरे यांच्या थोर व्यक्तिमत्वाचाच म्हणावा लागेल. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या लेखांची मालिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने १५४ भागात प्रसिद्ध केली. त्याच्या प्रती मूळ अंकाच्या कात्रणांसह बांधणी (बाईंडिंग) करुन गिरीश त्रिवेदी यांनी पुण्याला नंदकुमार दलाल यांच्या बरोबर पाठविली. तेंव्हा तर बाबासाहेबांनी गिरीश त्रिवेदी यांचे खास कौतुक करुन कृतज्ञता व्यक्त केली आणि खास पुण्याला बोलावून घेतले. साध्या माणसाचे कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा आणि दिलदार पणा बाबासाहेबच दाखवू शकतात, हे पुन्हा पुन्हा समाजासमोर आले. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद, भेदभाव न बाळगणारे, उच्च नीच असे न मानणारे, सर्वांना समान वागणूक देणारे असामान्य कर्तृत्व अंगी असलेला हा खराखुरा अगणित, असंख्यांचा आधारवड कोसळला. नव्हे हे हजारो, लाखो लोकांना आधार देणारे शिवरायांचे महाकाव्य, शिवरायांची महती साऱ्या विश्वात पोहोचविणारे बाबासाहेब पुरंदरे हे पुनश्च एकदा शिवरायांसमोर खड्या आवाजात ‘शिवकवन’ गाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वर्गीय दरबारात रुजू झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्य कर्तृत्व या सर्वच बाबतीत परिचित आहेत. केंद्रात आणि राज्यात बाबासाहेब पुरंदरे यांना मानणारे राज्यकर्ते आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांना भारतरत्न किताब देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिफारस करावी आणि नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘भारतरत्न’ किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव करावा, ही शिवप्रेमी नागरिकांची अपेक्षा. या महामानवाला साष्टांग प्रणिपात !

-योगेश वसंत त्रिवेदी.

error: Content is protected !!