छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट – समता परिषदेच्या मेळाव्यात वेगळा निर्णय घेणार
नागपूर – राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने राज्यातील ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनही केले जात आहे. खुद्द भुजबळ यांनीही हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठले आहे. नाशिक भुजबळांना भेटण्यासाठी राज्यभरातील ओबीसी नेते येत आहेत. आजच त्यांची नाशिकमध्ये बैठकही झाली आहे. त्यात भुजबळांनी अजित पवारांची साथ सोडावी, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, भुजबळांनी अजूनही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भुजबळांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाशिक जिल्ह्यातील आदिवासी नेते नरहरी झिरवाळ यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, छगन भुजबळ हे सिनियर नेते आहेत, त्यामुळे गोंधळ आणि त्या गोंधळाचा परिणाम जिल्ह्यावर, मतदारसंघावर अथवा सर्वसामान्य जनतेवर होईल, असे ते काहीही करणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे.
छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाला आहे, असं म्हणण्यापेक्षा त्यांच्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर काय ठरलं आहे, त्यांच्यात काय चर्चा झाली आहे, हे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला माहिती नाही, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. मी स्वतः भुजबळ यांना भेटून आलो आहे.
