संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट कमलखांवर कारवाईचे आदेश
संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट
कमलखांवर कारवाईचे आदेश
मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट ४ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक व प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. याचदरम्यान, बॉलीवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्याच्या पोस्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकिपिडीयाला मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत.
कमाल खानाने सोमवारी, १७ फेब्रुवारीला केलेल्या एक्सवरील एका पोस्टमध्ये विकिपीडियावरील माहितीचा आधार घेतला होता. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या व आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत. ‘छावा’च्या प्रदर्शनानंतर केआरकेने केलेली ही वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती हटवण्याचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांबाबत विकिपीडियावर लिहिलेल्या वादग्रस्त गोष्टींचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारने सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी विकिपीडियाशी बोलून संभाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त माहिती हटवून योग्य माहिती प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत.” सर्व खोट्या गोष्टी हटवून योग्य माहिती देण्यात यावी, असे आदेश दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं.