ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मराठी सिनेमात काम करायला आवडेल : आयुष्मान खुराना

मुंबई : हिंदी सिनेमा नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होत आहेत. अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर धमाल उडवली आहे. तेव्हा ‘सैराट’सारखी वेगळी कथा असल्यास मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते अभिनेते आयुष्मान खुराना यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने अभिनेते आयुष्यमान खुराना यांचा पत्रकार संघात वार्तालाप पार पडला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटातील करिअरची सुरूवात ते राष्ट्रीय पुरस्कार पर्यंतचा १२ वर्षांचा प्रवास खुराना यांनी उलगडला.
पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांच्या हस्ते अभिनेते खुराना यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. श्री. वाबळे यांनी खुराना यांचा गौरव ‘स्टार ऑफ द डिकेड’ (दशकातील सर्वोत्तम अभिनेता) अशा शब्दात केला. प्रास्ताविक कार्यवाह संदीप चव्हाण तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले. याप्रसंगी मंचावर विश्वस्त वैजयंती कुलकर्णी-आपटे आणि राही भिडे उपस्थित होत्या.
आयुष्मान खुराना पुढे म्हणाले की, कोणत्याही सिनेमात काम करताना तो सिनेमा हिट होईल, या उद्देशाने मी कधीच काम करीत नाही. जी कथा कधीच पडद्यावर आलेली नाही, प्रेक्षकांसाठी वेगळी आणि नवीनच असेल आणि नवीन काहीतरी करायचे या विचारानेच काम करतो. चंदीगड ही माझी जन्मभूमी असली तरी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. सगळेजण स्वप्न घेऊन मुंबईत येतात तसाच मी मुंबईत आलो आणि आता मी मुंबईकर आहे.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पुरस्कार मिळावा या उद्देशाने मी सिनेमात कधीच काम करीत नाही. काम केलेलेही नाही. प्रेक्षकांना आवडेल, भावेल अशाच नवनवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न मी करत असतो. नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करूनच आपण अनेक हिट सिनेमा दिले, नवीन दिग्दर्शकाकडे रिस्क घेण्याची क्षमता असते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खुराना यांनी ‘आलमारी की खुशबू’ ही आपली कविता सादर केली तेव्हा उपस्थितांकडून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली

error: Content is protected !!