विशाळगडावरील नुकसानीची अजितदादांकडून पाहणी
कोल्हापूर: किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलकांनी रविवार, १४ जुलै रोजी गडावरुन परत येताना मौजे गजापूर येथील मुसलमानवाडी या गावातील घरांचे आणि प्रार्थना स्थळाचे नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त भागाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली व स्थानिक पीडितांशी संवाद साधून दिलासा दिला. अतिक्रमणामध्ये संबंध नसलेल्या गावात गडावरुन परत येताना आंदोलकांनी मौजे मुसलमानवाडी येथे केलेल्या नुकसानाबाबत जिल्हा प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सर्वांना तातडीची मदतही शासनाकडून देण्यात आली आहे. तसेच विशाळगड अतिक्रमणाच्याबाबतीत नियमांच्या बाहेर जावून कोणावरही अन्याय केला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित पीडितांना सांगितले.
मूस लमानवाडी येथे विशाळगडावरील काही नागरिक व महिला अजित पवारांच्या भेटीला आल्या होत्या. सध्या विशाळगडावरील फक्त व्यावसायिक अतिक्रमणे काढली जात आहेत, न्यायप्रविष्ट अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसानंतर काढली जातील असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. यावेळी सोबत आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.