विचारपूर्वक मतदान करूया
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांचा जो प्रचार सुरू आहे ,जी आश्वासन दिली जात आहेत, ज्या पद्धतीने सभांमधून, चौकसभांमधून, पत्रकाद्वारे ज्याप्रकारे मतदारांशी संवाद साधला जातोय. त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणे म्हणजेच आपली आपणच फसवणूक करून घेण्यासारखे आहे .त्याचे कारण गेल्या ७० वर्षांमधील निवडणुकांचा इतिहास पाहता निवडणुकीत दिलेली सर्वच आश्वासने कधीही पूर्ण झालेली नाहीत. कारण लोकप्रतिनिधी निवडून गेल्यावर पुढील पाच वर्षात किती वेळा आपल्या मतदारसंघात येतात, आणि ज्यांनी निवडून दिले होते त्यांच्याशी किती संपर्क साधतात हे लोकांना ठाऊक आहे. मतदार हा निवडणुकीपुरता असतो. इतर वेळी मतदाराच्या काय समस्या आहेत ,मतदारासमोर कोण कोणत्या अडचणी आहेत, याच्याशी निवडून गेलेल्या लोकांना काहीही घेणेदेणे नसतं. अर्थात हे कुठल्या एकाच पक्षाच्या बाबतीत नाही. तर जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सगळ्यांनी आतापर्यंत याच पद्धतीने मतदारांची फसवणूक केलेली आहे .त्यामुळे मतदारांमध्ये राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांविषयी एक प्रकारची नाराजी आहे. निवडणुकीमध्ये दिवसेंदिवस मतदानाचा टक्का घसरतोय .त्याचे हेच मुख्य कारण आहे. मात्र काही जरी असले तरी प्रत्येकाने मतदान करायला हवे. कारण मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. अर्थात राजकीय पक्ष काय आहेत, किती इमानदार आहेत, मतदारांशी किती प्रामाणिक आहेत, हे वर्षानुवर्ष आपण पहात आलो आहोत. परंतु ते वाईट आहेत म्हणून देशातील लोकशाही पद्धतीच्या निवडणुकांकडे पाठ फिरवणे, हे काही बरोबर नाही. शेवटी लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला मतदान करायलाच हवे .पण हे मतदान करताना यापुढे अंध भक्त म्हणून मतदान न करता आपल्या मतदार संघात असलेल्या उमेदवारांपैकी जो चांगला असेल. ज्याचा लोकांशी सतत संपर्क असेल, मग तो कुठल्याही पक्षाचा असो अशाच माणसाला आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायला हवे. या निवडणुकीत प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्येच खरी लढत होणार आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये सहभागी असलेल्या सहाही पक्षांचा आजवरचा इतिहास फार काही चांगला होता असे म्हणता येणार नाही. महायुतीमध्ये तर फुटीरांचा समावेश आहे. आणि जे फुटीर असतात ते कधीच विश्वासू नसतात .कारण ज्यांनी आपल्या पक्षाला दगा दिलेला असतो, ज्या पक्षाने त्यांना मोठं केलेलं असतं ,त्यांच्याच पाठीत ज्याने खंजीर खुपसलेला असतो, असे लोक मतदारांची काय किंमत करणार? मागील दोन अडीच वर्षांमध्ये जे फाटाफुटीचे घाणेरड राजकारण महाराष्ट्रात बघायला मिळालं, ते अत्यंत घृणास्पद होतं .दुसऱ्याचे पक्ष फोडायचे आणि सरकारे बनवायची. यालाच लोकशाही म्हणायचं का? म्हणूनच ज्या लोकांनी असे प्रकार केले कारण आज आम्ही यांना निवडून द्यायचे आणि उद्या सत्तेसाठी ते दुसऱ्या पक्षात जायचे हे असं किती दिवस चालणार ? बरं अशा प्रकारे पक्षांतर करताना ते मतदारांना कधीही विश्वासात घेत नाहीत .ज्या पक्षाच्या विरोधात मतदारांनी त्यांना निवडून दिलेले असते त्या पक्षाशी पुन्हा सोयरीक करताना, त्यांना भलेही लाज वाटत नसेल. पण त्यांना निवडून देणाऱ्यांचा मात्र आत्मा जळत असतो. आज केंद्रात आणि राज्यात भाजपा आघाडीचे सरकार आहे. या लोकांना खरोखरच आयाराम गयाराम ना रोखण्याची इच्छा असती आणि मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई व्हावी असे प्रामाणिकपणे वाटत असते, तर या लोकांनी पक्षांतर बंदी विरोधी कायदा अधिक कडक केला असता. कारण निवडणुकीत जर मतदार हा प्रमुख घटक असेल, तर पक्षांतर बंदी विरोधी कायद्यामध्ये त्याचा विचार का केला जात नाही? केंद्रातील किंवा राज्यातील सरकारने याचा कधी विचार केला आहे का? फक्त मतदारांना कसेही वापरून घ्यायचे .निवडणूक काळात त्यांची कशीही फसवणूक करायची, आणि निवडणुका जिंकायच्या, त्यानंतर जर बहुमत मिळाले नाही तर दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायचे. त्याला विविध प्रकारची आमिष दाखवायची, आणि आपल्या पक्षात घ्यायचे, आपला पक्ष वाढवायचा, आपले सरकार टिकवायचे जर याच पद्धतीने सरकार अस्तित्वात येणार असतील आणि पुढे चालवली जाणार असतील, तर लोकशाही टिकेल का? आणि म्हणूनच यावेळी प्रत्येक मतदाराने अत्यंत विचारपूर्वक मतदान करायला हवे .सध्या आयाराम दयारामांचे जे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते अत्यंत वाईट आहे. परंतु राजकारणात काही चांगली माणसं सुधा आहेत. ज्यांना समाजसेवेची आवड आहे. ज्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव आहे ,आणि याच जाणीवेतून जे लोक लोकांसाठी काही करू इच्छितात. अशा लोकांच्या पाठीशी उभे राहणे हेच आजच्या मतदारांचे कर्तव्य आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे, राज्य सरकारची ऐपत नसताना, सरकारवर प्रचंड असे कर्ज असताना, केवळ आपल्या पक्षाच्या फायद्यासाठी लाडकी बहीण योजनेसारख्या खर्चिक योजना ज्यांनी राबवल्या. आणि पुढेही राबवण्याची घोषणा केली आहे. आणि त्यांच्या घोषणा ऐकून त्यांना शह देण्यासाठी, विरोधी पक्षातल्या लोकांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट करण्याचे जे आश्वासन दिले आहे, ते सुद्धा बरोबर नाही. लाडकी बहीण योजनेसारख्या योजना जरूर राबवा. पण स्वतःच्या खिशातले किंवा पक्ष निधीतून राबवा. सरकारवर त्याचा बोजा टाकू नका. सरकारची अवस्था खूप वाईट आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार काय, तीन हजार काय, किंवा ५००० काय किती वाटेल तेवढी रक्कम द्या. पण आपल्या पक्षाच्या निधीतून किंवा जे कोणी तुमच्या पक्षातले पैसेवाले नेते आहेत. त्यांच्या खिशातून पैसे काढून ही योजना राबवा .सरकारी पैशातून ही योजना राबवणे म्हणजे राज्याला महागाईच्या वनव्यात लोटण्यासारखे आहे. या गोष्टीचाही या निवडणुकीत मतदारांनी विचार करायला हवा .कारण शेवटी लोकशाही टिकवण्याचे काम हे मतदारांना करायचे आहे .त्यामुळे या निवडणुकीकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे.