निवडणूक आयोग बरखास्त करा – उद्धव ठाकरे
मुंबई -निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे तो आम्हाला मान्य नाही. त्याविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. तिथे योग्य तो निर्णय लागेल पण निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणूक प्रक्रियेद्वारे आयुक्तांची निवड करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे . दरम्यान शिंदे गटाला व्हीप काढण्याचा अधिकार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आताचा निवडणूक आयोग बरखास्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच निवडणूक प्रकियेद्वारे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोग कधीच बरखास्त होऊ शकत नाही, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठीने दिलं.
एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदे यांना व्हीप जारी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला आहे, तो माझ्यासारख्या लोकशाहीमध्ये काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्याला मनापासून पटला नाही. पण निवडणूक आयोगानं निर्णय दिला आहे. त्यामुळे त्यावर कुणी काहीही बोलू शकत नाही. कधी कधी आपल्याला न्यायालयाचे निर्णयही मान्य होत नाहीत. पण तो निर्णय न्यायालयाने दिलेला असतो, त्यात आपण काहीही बोलू शकत नाही.”
शिंदे गटाकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो का? यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “व्हीप जारी करणं किंवा व्हीप लावणं हा त्यांचा (शिंदे गट) अधिकार आहे. कारण संविधानाने मान्य केलेल्या निवडणूक आयोगानं त्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून त्यांना सगळे अधिकार प्राप्त आहेत.