ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्री अशोक शिंदे यांचे दुःखद निधन
; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : कांदिवली येथील ठाकूर संकुलात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ राजश्री अशोक शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांच्या त्या पत्नी होत तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री कीर्ति कुमार शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. गेल्या आठवड्यात तापासारखे वाटू लागल्याने सौ. राजश्री अशोक शिंदे यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. श्री. दादासाहेब शिंदे आणि सौ. राजश्री शिंदे यांचा मध्य मुंबई पासून उपनगरातील विविध संस्थांशी घनिष्ठ संबंध असल्याने आणि सर्वांसमवेत मिळून मिसळून वागण्याच्या स्वभावामुळे सौ. राजश्री अशोक शिंदे यांच्या निधनाचे वृत्त समजताच कांदिवली येथील ठाकूर संकुलात अंत्यदर्शनासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी धाव घेतली बोरीवली पूर्व येथील दौलत नगर स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सौ. राजश्री अशोक शिंदे या आयुष्यभर दादासाहेब शिंदे यांच्या पाठीशी सावली सारख्या उभ्या राहिल्या. मायेच्या ममतेने त्यांनी सुपूत्र सम्राट, विशाल आणि कीर्ति कुमार तसेच सुना नातवंडे इतकेच नव्हे तर दस्तुरखुद्द दादासाहेब शिंदे यांना सांभाळले. सौ. राजश्री यांच्या निधनाने कांदिवली बोरिवली पासून मध्य मुंबई परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.