इंद्राणीला देव पावला साडेसहा वर्षानंतर बाहेर येणार
नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरून सोडलेल्या शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर साडेसहा वर्षानंतर जामीन मंजूर केला. या प्रकरणाला 10 वर्षे पूर्ण झाली, आजही या प्रकरणाचे गूढच कायम असताना आता जामिन मिळाल्याने इंद्राणी मुखर्जीला तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्हाला खटल्याच्या गुणदोषांवर कोणतेही भाष्य करायचे नाही. इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांपासून तुरुंगात आहे आणि खटला लवकर संपणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. इंद्राणीने सहआरोपी जामिनावर बाहेर असताना आधीच साडेसहा वर्षे तुरुंगात घालवली आहेत. हे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे. इंद्राणी मुखर्जी यांच्यावर अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यांना अजून तुरुंगात ठेवणे योग्य नाही. त्यांची जामिनावर मुक्तता करावी, असे न्यायालयाने सांगितले.
शीनाचा मृतदेह 23 मे 2012 रोजी रायगडजवळ आढळून आला होता. याप्रकरणी आधी इंद्राणीचच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शीनाची आई इंद्राणीला अटक करण्यात आली. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होती. सीबीआयने या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही केला आहे. ही एक अशी मर्डर मिस्ट्री आहे, जिचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की सुरुवातीला शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीने तिची बहीण असल्याचे सांगितले होते, मात्र पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचे उघड केले. इंद्राणी मुखर्जीने दोन लग्न केली होते. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती.