तोडी मिल फॅन्टसी’ नावाचं अंकुशचं नाटक – कापड गिरण्या अन् गिरणी कामगारची दैना
मुंबई… कापड गिरण्या अन् गिरणी कामगार ही मुंबईची खरी ओळख आहे. मात्र हीच ओळख हळूहळू पुसत गेल्लयच अंकुशने या पोस्टमध्ये सांगितलंय.
कामगारांचं अस्तित्व ही मुंबईनगरी नाकारू लागली आहे. त्या जाणिवेतून अस्वस्थता येत असल्याचं अंकुश म्हणाला आहे. गिरणी कामगारांवर आधिरित एक नाटक अंकुश करतोय. ‘तोडी मिल फॅन्टसी’ नावाचं अंकुशचं एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अंकुशने ही पोस्ट शेअर केलीय. यात त्याने मनातील खंत बोलून दाखवली आहे.
अंकुशची पोस्ट जशीच्या तशी
नमस्कार,
मी अंकुश चौधरी. गेली पन्नास वर्ष मी या मुंबई शहरात राहतोय. या शहराचा वेग आणि त्याच वेगाने बदलणारं हे शहर मी रोज पाहतोय. याच शहरातल्या गिरणगावात मी लहानाचा मोठा झालो. कॉलेज, नाटक, कट्टा, उत्सव, मॅटर, कॉटर, दोस्ती, यारी, थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी.
सांगायची गोष्ट ही की हे शहर बदलतंय आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांना सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे. कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललेलं आहे. ज्यांनी आपल्या रक्ताच पाणी करून हे शहर उभ केलं, त्या कामगारांचं अस्तित्वच हे शहर नाकारू लागलंय. या साऱ्याची जाणीव आणि जाणिवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच. एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यत पोहचावी म्हणून या शहराची, शहरातील गिरणगावाची आणि या गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार ‘तोडी मिल फॅन्टसी’ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. २२ जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह. सायंकाळी ४:०० वा. राणीबाग भायखळा येथे. या आपल्या शहराची, आपल्या गिरणगावाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझी खात्री आहे माझ्या या प्रयत्नात तुम्ही मला नक्की साथ द्याल.अशी पोस्ट शेअर केली आहे.
