ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमा अर्थात कृतज्ञता दिन

संपूर्ण भारतवर्षात गुरुपौर्णिमा उत्साहात व मोठ्या आनंदाने साजरी केली जाते .चार वेद अठरा पुराणे ,व भगवदगीता ज्या महाभारतात आहेत्या महाभारताचे जनक म्हणून महर्षी व्यास सर्वाना परिचित आहेत . आज आषाढ पौर्णिमा हा .महर्षी व्यासांचा जन्मदिन.
आद्य गुरु महर्षी व्यासांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून व्यास जयंती आपण व्यासपौर्णिमा किंवाअधिक रुढ झालेल्या शब्दात म्हणायचे तर गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करीत असतो
स्वामी विवेकानंद म्हणतात , ” माझ्या जीवनात सर्वात जवळची व जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणजे माझे गुरु. प्रथम गुरु.नंतर माता ,नंतर पिता. जर माझ्या आई वडिलांनी एखादी गोष्ट मला करायला सांगितली पण माझ्या गुरुंनी करू नकोस असे सांगितले तर ती गोष्ट मी करणार नाही. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट मला आईवडिलांनी करू नकोस असे सांगितले पण गुरुंनी कर म्हणून सांगितले तर ती गोष्ट मी करेन “

          गुरुर्ब्रह्म   गुरुर्विष्णु  गुरुदेवो  महेश्वरा I
          गुरु साक्षात  परब्रह्म  तस्मैश्री  गुरुवे  नम : II

हा संस्कृत श्लोक आपणास अर्थासह सुपरिचित आहेच.
कर्मकांड , उपासनाकांड व ज्ञान कांड असे वेदाचे तीन विभाग आहेत .अनेक ऋषिमुनींनी भाष्ये ,टीका अशा विभिन्न माध्यमातून द्वैतवाद , अद्वैतवाद , विशिष्टाद्वैतवाद याचे स्पष्टीकरण केलेले आहे
.वेदान्त हा अखेरचा भाग उपनिषदात आहे .महर्षि व्यासांनी ब्रह्मसूत्रे रचून वेदान्त एक स्वतंत्र विषय करून दाखविला आहे. भगवदगीता उपनिषदांचे सार आहे. वेदांत म्हणजे ज्ञानाचा अंत — जेथे ज्ञाता , ज्ञेय, ज्ञान हा त्रिपुटीभेद नष्ट होतो अर्थात द्वैतभाव उरत नाही.

         गुरु  शब्दाची    व्युत्पत्ती  पाहिल्यास  लक्षात  येईल  की  गु:  म्हणजे  अंध:कार  आणि  रू:  म्हणजे नाश करणे.त्याचंप्रमाणे गु अक्षर  दर्शविते  गुणातीत  तर  रु  अक्षर  सुचित  करते  रूपविरहित , निराकार.परमेश्वराला  संबोधताना  आपण  निर्गुण,निराकार अव्यक्त  असे  शब्द  वापरतो..गुरूबद्दल  आत्यंतिक आदर व्यक्त करण्यासाठी  आपण  परमेश्वराचे  सगुण , साकार  रूप म्हणजे  गुरु  असे  म्हणतो

         भगवदगीतेमध्ये   ज्ञानार्जनाचे    प्रकार  सांगितले  आहेत .
                   "  तद्विद्धि   प्रणिपातेन  , परिप्रश्नेन  सेवया   " (  अध्याय  ४  /   ३४ )

म्हणजेच गुरुकडील ज्ञान गुरूला शरण जाऊन ,नम्रपणे, पुन्हा पुन्हा विचारण्याने आणि गुरूची सेवा करून प्राप्त करून घे.नम्रता हा ज्ञान संपादनाचा प्रारंभ आहे.गुरूजवळ शिष्य रिकामे मन घेऊन जातो
.सागरात अपरंपार पाणी आहे.परंतु जर भांडे वाकणार नसेल तर भांड्यात अनंत सागरातील एक थेंब देखील शिरणार नाही.केवळ विनम्र होऊन येणारा जो ज्ञानोपासक शिष्य असतो त्याची जातकुळी गुरु विचारत नाही. शिष्याची तळमंळ ही एकच गोष्ट गुरु जाणतो.गुरु आपल्याला शाश्वत चिरंतन ज्ञानाचा मार्ग दाखवितो. शाळेतील विद्यार्थी प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतात. गुरूजवळ मात्र काही न बोलता ,काही न विचारता देखील आपल्या मनातील शंका दूर होतात. केवळ शांतपणे एकचित्ताने, एकाग्रतेनेऐकायचे असते. न विचारता गुरु शंका निरसन करतो. न विचारता शिष्य शिकत जातो.

             समर्थ  रामदासानी  म्हटले आहे ,"  नेणतेपण  सोडू  नये  ". आपण  अज्ञानी  आहोत.आपणाला अजून  बरेच  काही  शिकायचे आहे  असे  सदैव  वाटणे  हा  प्रगतीचा  मार्ग आहे. न्यूटन  म्हणायचा , "माझे ज्ञान  सागरातील  बिंदूइतके  आहे.थोर   तत्वज्ञ   सौक्रेटीस  म्हणायचा , "  मला   काही  माहित  नाही  हेच फक्त  मला समजते." 

              गुरु  म्हणजे  अनंत ज्ञानाची   मूर्ती  असे  शिष्याला  वाटले  पाहिजे .गुरु  निरपेक्ष  असतो. मनुस्मुतीत  म्हटले   आहे," अरे ,तुझ्याजवळ  द्यावयास  काहीही  नसले तरी खडावाचा   एक  जोड  दे. एक कुंभ   भरून दे ." शिष्याचे  कृतज्ञतेने  भरलेले  हृदय  हीच  गुरुदक्षिणा..

स्वामी विवेकांनद म्हणतात,

           "   आपण  आज  काय  आहोत   ते आपल्या  गतकर्माचे  फळ होय आणि  आता  करीत असलेल्या  कर्मानुसार  नि  विचारांनुसारच  आपण  आपले  अदृष्ट  घडवित  असतो. म्हणून  बाहेरून  आपणास  कोणतेही  सहाय्य  आवश्यक  नाही  असे  मात्र नव्हे.उलट   बहुतांश  लोकांच्या  बाबतीत  अशा  प्रकारच्या  सहाय्याची  आवश्यकता असतेतसे सहाय्य  जेव्हा  एखाद्याला  लाभते  तेव्हा  त्याच्या  ठायी  सुप्त असलेल्या उदात्त,उच्य  शक्ती  स्फुरण  पावू लागतात. आध्यात्मिक  जीवनाला गती मिळते. उन्नती  त्वरेने  होते आणि  साधक  शुद्ध  होऊन  अखेरीस  सिद्ध  होतो.  "

१५ जानेवारी १८८२ रोजी रामकृष्ण परमहंस विवेकानंदाना म्हणाले , ” मी माझे सारे ज्ञान आज तुला देऊन टाकतो . माझी सारी साधना आज तुझ्यात ओततो.” स्वामी विवेकानंदाच्या जीवनातील त्या दुर्मिळ क्षणाचे वर्णन काय करावे ?

             गुरूचा सहवास , सान्निध्य , व  मार्गदर्शन  याचे महत्व  विशद  करताना  स्वामी विवेकानंद म्हणतात, 
             "  बहुतेक   प्रत्येकजण  आध्यात्मिक  विषयावर  इतरांना  थक्क  करून   सोडण्याइतपत अतिसुंदर  बोलू  शकत  असला तरी  प्रत्यक्ष  आचरणात  आणताना , यथार्थ  धार्मिक  जीवन  प्रत्यक्ष जगतेवेळी  आपल्या  सर्वांची  इतकी  त्रेधातिरपिट  उडते याचे  कारण तरी    हेच  की ग्रंथाच्या   

भा ऱ्यांनी आध्यात्मिक उन्नती कधीही साधत नसते. अंतरात्म्याच्या जागृतीसाठी दुसऱ्या आत्म्यापासूनच शक्ती यावयास हवी. “

"अध्यात्म विद्या  विद्यानाम " असे भगवद् गीता  सांगते . जीवन सुंदर  करणे , स्वतःचे जीवन निर्दोष, निष्काम ,निरुपाधिक  करणे ही  सर्वात   श्रेष्ठ  विद्या..जगात  शास्त्रांचा  कितीही  विकास   झाला असला  तरी  जीवन  जगण्याची  कला  ज्ञात  झाल्याशिवाय  सारे  व्यर्थ  होय.समाजात परस्परांशी कसे वागायचे ते आधी  शिका  असे  महर्षी  टोलस्टोय   म्हणायचे. आध्यात्मिक  अंगाने  गुरूला ओळखायचे कसे  ? या प्रश्नाचे  उत्तर  देताना  स्वामी  विवेकानंद  म्हणतात ,

                "  सूर्याला  उजेडात  आणण्यासाठी  काडवातीची  गरज पडत  नाही.  सूर्य  उगवताच आपल्याला  आपोआप   कळून  चुकते   की  सूर्योदय   झालेला  आहे.तद्वतच   जीर्णोद्धारार्थ   गुरुचे  आगमन  होताच  आपल्यावर  सत्यसूर्याचा  उजेड  पडण्यास प्रारंभ   झाला  आहे."

युरोप खंडात मी अमक्याचा शिष्य ,मी अमुक गुरूच्या पायाशी बसून शिकलो असे सांगण्यात मोठा अभिमान बाळगतात. सॉंक्रेटीस चा शिष्य म्हणवून घेताना प्लेटोला धन्यता वाटे तर प्लेटोचा शिष्य म्हणवून घेण्यात अरीस्टोटल ला कृतार्थता वाटत असे . इब्सेन चा अनुनायी म्हणताना जॉर्ज
ब र्नाड. शॉ ला अभिमान वाटत असे तर मार्क्स चा शिष्य म्हणवून घेताना लेनिनला धन्यता वाटे.

       गुरु  आपल्या  पुढे  जाणाऱ्या  शिष्याचं  कौतुक  करतो. शिष्याकडून पराजय  होण्यात गुरूला अपार आनंद  होतो.  कारण   शिष्याचा   विजय  हा गुरुचाच  विजय  असतो.  अप्पासाहेब   पटवर्धन  लोकमान्य  टिळकांना आशीर्वाद देत. संत ज्ञानेश्वरानी     देखील  हरिपाठात  त्यांचे  गुरु निवृत्तीनाथांचा 

वारंवार उल्लेख केला आहे.
एका अभंगात ते म्हणतात ,

     "  ज्ञानगूढ  गम्य  ज्ञानदेवा  लाधले  I  
         निवृत्तीने   दिधले  माझे  हाती  II

त्याचप्रमाणे ,
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान I
समाधि संजीवन हरिपाठ II

आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान मा झ्या गुरुकडून ,निवृत्ति नाथांच्या कृपेने मिळाले असे ज्ञानेश्वर माऊली प्रांजळपणे ,उदार अंत: करणाने कबुल करतात.त्याचप्रमाणे गुरुंनी सांगितले की ते प्रमाण मानायचे. काहीही शंकाकुशंका मनात न आणता फक्त आज्ञापालन करायचं हे ही संत ज्ञानेश्वर सुचवितात.

अर्जुनाचा गुरु श्रीकृष्ण , एकलव्याचा गुरु द्रोणाचार्य , कबिरांचे गुरु रामानंद ,ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तिनाथ , विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस ,.सदगुरू श्री.वामनराव पै यांचे गुरु नानामहाराज श्रीगोंदेकर गुरु – शिष्यांची थोर परंपरा लाभलेली भारतभूमी..गुरु शिष्यांचे संबंध शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे.आपले जीवन शुद्ध , स्वच्छ , निर्मळ व्हावे अशी तळमळ जोपर्यंत माणसात राहिल तोपर्यंत गुरु शिष्याचे नाते अतूट राहील.
सदगुरु श्री. वामनराव पै म्हणतात, ” कृतज्ञता हे पुण्य..गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञता दिन. कोण,केव्हा, कुणाला , कसा, कुठे उपयोगी पडेल ते सांगता येणार नाही.” म्हणून कृतज्ञता व्यक्त करायची ती सर्वांबद्दल. या चारोळी द्वारे.–

                   "  हे  ईश्वरा  ,  सर्वाना   चांगली  बुध्दी    दे ,आरोग्य  दे ,
                      सर्वांना  सुखात , आनंदात , ऐश्वर्यात  ठेव ,
                      सर्वांचे भलं  कर ,कल्याण  कर , रक्षण  कर,

आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे “

-प्रा.श्री. सुहास पटवर्धन
## लेखक जीवन विद्या मिशन मध्ये प्रसारक म्हणून कार्यरत असून ते
चाळीस वर्षे जीवन विद्या मिशनच्या कार्याशी निगडीत आहेत..

error: Content is protected !!