अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे – मुख्यमंत्र्यांचे विधासभेत आश्वासन
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, याकडे महिलांचे डोळे लागले आहेत. या लाडकी बहीण योजनेची हिवाळी अधिवेशनातही चर्चा झाली. या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या निकषावरही भाष्य केलं.
नागपूर मध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेविषयी महत्वाची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी सभागृहात आश्वस्त करतो. तुमच्या मनात कोणतीही शंका नको. जी आश्वासने, योजना.. त्यापैकती एकही योजना बंद होऊ देणार नाही. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. आता हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबरचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकतो. तसेच या योजनेचे कुठलेही निकष नाहीत’.’काही लोकांनी चार-चार खाती उघडली आहेत. एका माणसाने तर थेट ९ खाती टाकली. लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो, तो लाडका भाऊ कसा… असा प्रकार आहे. आम्ही शेतकरी, युवा, ज्येष्ठ, वंचित यांना दिलेली आश्वासन पूर्ण करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. डिसेंबरचा हप्ता लवकर मिळणार असल्याचे जाहीर केल्याने देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.