निवडणुकीच्या कामातून पालिका सेवेतन परतलेल्या कामगारांचे वेतन रोखले
मुंबई : महानगरपालिकेतील हजारो कामगार – कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ तैनात करण्यात आले होते. मात्र, पालिकेचे ५८६ कर्मचारी अद्यापही पुन्हा सेवेत रुजू झालेले नाहीत. दरम्यान, पालिकेच्या ४६ कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. त्यामुळे अन्य कर्मचारी लवकर मूळ सेवेत परतण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महा पालिकेच्या सुमारे ६५ हजार कामगार – कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या कर्तव्यार्थ पाठविण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पालिकेतील कर्मचारी मूळ कामावर परतले. मात्र, निकाल लागून दोन महिने उलटत आले, तरीही ५८६ कर्मचारी पालिकेत रुजू झाले नाहीत. निवडणुकीनंतर आर्थिक बाबींचा अहवाल तयार करण्यासह अन्य कामांच्या पूर्ततेसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना थांबवण्यात आले होते. ते काम अंतिम टप्प्यात आले असून कर्मचारी पुन्हा मूळ सेवेत परतणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वीच सांगितले होते. दरम्यान, महानगरपालिकेने वेतन कपातीचा इशाराही दिला होता. मात्र, अद्यापही कर्मचारी मूळ कामावर परतले नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेने या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून मुक्त करण्यासंदर्भात पूर्वीच लेखी पत्र पाठवले होते. त्यानंतरही कर्मचारी निवडणूक कामातच व्यस्त आहेत. हे कर्मचारी लेखा विभाग, निवृत्तीवेतन विभागासह अन्य विभागातील आहेत. इतके मनुष्यबळ अद्याप पुन्हा कार्यरत न झाल्याने महापालिकेच्या नैमित्तिक कामावर त्याचा परिणाम होत आहे..