सरकारने लॉटरी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा-
सरकारने लॉटरी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा ।- विलास सातार्डेकर
मुंबई -महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या प्रस्तावाला राज्यातील हजारो लॉटरी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला असून सरकारने लॉटरी बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतल्यास विक्रेत्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी आज मुंबई मराठी संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
१९६९ पासून सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी राज्य सरकारसाठी महसुलाचा महत्त्वाचा स्रोत ठरली आहे. या उपक्रमातून हजारो विक्रेत्यांना रोजगार उपलब्ध झाला असून, त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावले आहे. राज्य लॉटरीने लाखो ग्राहकांना संधी दिली असून, त्यातून अनेकांनी आर्थिक स्थैर्य प्राप्त केले आहे.
जीएसटी लागू होण्यापूर्वी राज्य शासनाला लॉटरीतून हजारो कोटी रुपयांचा महसुल मिळायचा. मात्र, जीएसटी लागू झाल्यानंतर लॉटरी व्यवसायावर नकारात्मक परिणाम झाला आहे. अंदाजे २५ कोटी रुपयांचे राज्यश्री जीएसटी मिळकत असून, १०० – १२५ कोटींचा महसुल राज्य सरकारला दरवर्षी मिळतो.
विक्रेत्यांनी लॉटरी बंद करण्याऐवजी ती चालविण्यासाठी सहकारी तत्वावर योजना राबविण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारने उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून लॉटरी जिवंत ठेवण्यासाठी चर्चा करावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
लॉटरी बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतल्यास विक्रेत्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनाचे नेतृत्व विक्रेत्यांचे नेते विलास सातार्डेकर करतील.
लॉटरी विक्रेत्यांनी सरकारकडे स्वतंत्रपणे लॉटरी चालविण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. सरकारी लॉटरीच्या प्रतिष्ठेला धक्का न लावता विक्रेत्यांना ती चालविण्याचा अधिकार दिल्यास हा व्यवसाय टिकवून ठेवता येईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
लॉटरी बंदीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, विक्रेत्यांनी हा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा आणि विक्रेत्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती सरकारकडे केली आहे.
५५ वर्षांपूर्वी सुरू झालेली महाराष्ट्र राज्य लॉटरी हा केवळ रोजगाराचा स्रोत नाही, तर ती अनेकांच्या आयुष्याचा आधार आहे. त्यामुळे सरकारने या उपक्रमाला पाठबळ द्यावे आणि लॉटरी बंदीचा निर्णय मागे घ्यावा, असा ठाम आग्रह विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.