६५ हजार एसटी कामगारांना मिळणार गणवेश
मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आनंदाची बातमी आहे. एसटीच्या राज्यभरातील ६५ हजार कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना नवे कोरे गणवेश पुरविण्यासाठी टेंडर काढले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दोन गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता मिळणार आहे. या नव्या निर्णयामुळे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कामगारांसाठी आणलेले नव्या प्रकारचे गणवेश रद्द होणार आहेत.एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना नविन गणवेश मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना गणवेशाचे कापड पुरविण्यासाठी महामंडळाने दहा लाख साठ हजार रूपयांचे टेंडर काढले आहे. एसटी महामंडळात एकूण नव्वद हजार कर्मचारी असले तर चालक आणि ड्रायव्हर व इतर प्रत्यक्ष फिल्डवरील६५ हजार कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी दोन गणवेशाचे कापड आणि एका गणवेशासाठी २५० रुपये शिलाई भत्ता याप्रमाणे 500 रुपये शिलाई भत्ता दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सन २०२२मध्ये कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन संपाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या संघटनेवर चर्चा करत असताना 20 पैकी १८ मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे गणवेशाचे कापड पुरवले जाईल ही मागणी देखील होती. त्यानुसार या नव्या निविदेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना वर्षाचे दोन गणवेश तयार होतील इतके कापड दिले जाईल. तसेच एका गणवेशासाठी २५० रुपये शिलाई भत्ता याप्रमाणे५०० रुपये शिलाई भत्ता दिला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली.