बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ तरण तलावांमध्ये मिळणार पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण
‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्वावर ऑनलाइन पद्धतीने होणार २१ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी
२५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होणार नाव नोंदणी
‘जलतरण’ अर्थात ‘पोहणे’ हा जसा एक क्रीडा प्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक चांगला व्यायाम प्रकारही आहे. मुंबईकर नागरिकांना या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे ६ तरण तलाव मुंबईकरांच्या सेवेत कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने अनेक इच्छुक या क्रीडा प्रकारापासून लांब राहतात. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६ जलतरण तलावांमध्ये येत्या २ मे २०२३ पासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे. तर याच प्रशिक्षणाच्या दुस-या कालावधीचा प्रारंभ दि. २३ मे पासून होणार आहे. महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठीची लिंक मंगळवार, दिनांक २५ एप्रिल पासून कार्यान्वित होणार आहे. यासाठीची नोंदणी ‘प्रथम येणाऱ्या प्रथम प्रवेश’ या पद्धतीने दिली जाणार असल्याने इच्छुकांनी आपला प्रवेश शक्य तेवढ्या लवकर घ्यावा, अशी माहिती उप आयुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांनी दिली आहे.
..
याबाबत अधिक माहिती देताना उपायुक्त किशोर गांधी यांनी सांगितले की, मुंबईत विविध खाजगी संस्थांद्वारे १५ दिवसांच्या जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी साधारणपणे ६ हजार रुपयांपर्यंत शुल्क असते. तथापि, या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार माफक शुल्कात म्हणजेच पंधरा वर्षांपर्यंत रुपये २ हजार, तर त्या पुढील वयोगटासाठी रुपये ३ हजार एवढ्या माफक शुल्कात प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणारे जलतरण प्रशिक्षण हे २१ दिवसांचे असणार आहे. याचाच अर्थ खाजगी संस्थांच्या तुलनेत शुल्क कमी; आणि प्रशिक्षणाचे दिवस जास्त असणार आहेत, असेही श्री. गांधी यांनी आवर्जून नमूद केले आहे.
..
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा अव्याहतपणे देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिकेत मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी देखील सातत्याने घेत असते. याच काळजीचा एक भाग म्हणजे महानगरपालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या क्रीडा विषयक सोयी-सुविधा ! याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ६ जलतरण तलाव सध्या कार्यरत आहेत. या जलतरण तलावांमध्ये दि. २ मे २०२३ ते दि. २२ मे २०२३ आणि दि. २३ मे २०२३ ते दि. १२ जून २०२३ या कालावधीत दरम्यान जलतरण प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही प्रशिक्षण कालावधींमध्ये व ६ जलतरण तलावात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात साधारणपणे ६ हजार प्रशिक्षणार्थींना नोंदणी करता येणार असून यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिकांना जलतरणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक श्री संदीप वैशंपायन यांनी दिली आहे.
..
जलतरण प्रशिक्षण हे दररोज दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३ आणि ३.३० ते ४.३० अशा तीन तुकड्यांमध्ये २१ दिवस आयोजित केले जाणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे १५ प्रशिक्षणार्थींच्या मागे प्रत्येकी एक प्रशिक्षक असणार आहेत. या प्रशिक्षणासाठी पंधरा वर्षे वयापर्यंत रुपये २ हजार, तर त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी रुपये ३ हजार इतके शुल्क आकारले जाणार आहे. तथापि, दिव्यांग सभासदांना रुपये २ हजार इतकी शुल्क आकारणी केली जाणार आहे, असेही श्री वैशंपायन यांनी कळविले आहे.
..
वरील नुसार प्रशिक्षणासाठी नोंदणी करताना खालील अटी लागू असणार आहेत
१) “कोणताही त्वचारोग नाही व पोहण्यासाठी सक्षम आहे” असे स्पष्टपणे नमूद केलेले वैदयकिय अधिका-यांनी दिलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.
२) तसेच वय वर्षे १८ पर्यंतच्या सभासदाने पालकांचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. (नमूना संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे.)
३) वय वर्षे ०२ ते ०६ वयोगटातील प्रवेश घेणा-या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेताना त्यांची जबाबदारी घेणा-या पालकाचा ‘ट्रांझॅक्शन आयडी’ प्रणालीत नमूद करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांचे हमीपत्र जोडणे आवश्यक आहे. (नमूना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.)
४) तरण तलावाच्या प्रचलित नियम अटींच्या अधीन राहून प्रवेश दिला जाईल.
५) सदर सत्रासाठी सभासदत्व घेतलेल्या सभासदास कोणत्याही कारणास्तव शुल्काचा परतावा करण्यात येणार नाही.
६) सदर सत्रासाठी घेतलेले सभासदत्व अहस्तांतरणीय आहे.
७) सत्र रद्द करण्याचे किंवा सत्राच्या वेळात बदल करण्याचा अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन राखून ठेवीत आहे. सदर विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच दि.२५ एप्रिल रोजी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू
करण्यात येईल.
८) सभासदत्वासाठी कृपया खालील लिंकचा उपयोग करावा
https://swimmingpool.mcgm.gov.in/
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या तरुण तलावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, त्यांचा तपशील पुढील प्रमाणे :-
१. महात्मा गांधी स्मा. जलतरण तलाव, वीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८
२. जनरल अरूणकुमार वैद्य जलतरण तलाव,
शरदभाऊ आचार्य मार्ग, नटराज सिनेमाजवळ,
चेंबूर (पूर्व), मुंबई-४००७१
३. सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव,
आर दक्षिण विभाग कार्यालयाजवळ,
एम.जी. क्रॉस रोड नं.२,
कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७
४. बृहन्मुंबई महानगरपालिका मालाड (प.) जलतरण तलाव, चाचा नेहरु मैदानाजवळ, राज मनोर सोसायटीच्या मागे, मामलेदारवाडी मुख्य रस्ता, मालाड पश्चिम,
मुंबई-४०००६४
५. श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव, अशोक वन, शुक्ला कंपाउंड, दहिसर (पूर्व), मुंबई-४०००६८
६. बृहन्मुंबई महानगरपालिका दहिसर (प.) जलतरण तलाव, वामनराव भोईर मार्ग, मास्टटरशेफ हॉटेल समोर,