लोकशाही टिकविण्यासाठी चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा
क
द
न्या. मृदूला भाटकर यांचे आवाहन
मुंबई मराठी पत्रकार संघाचा 81 वा वर्धापनदिन साजरा
मुंबई, दि. 22 – वस्तूनिष्ठ लेखन असलेली पत्रकारिता जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचे, पर्यायाने लोकशाहीचे आणि चौथ्या स्तंभाचे प्राणपणाने रक्षण करा, असे आवाहन महनीय प्रवक्त्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मृदूला भाटकर यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघाचा 81 वा वर्धापनदिन समारंभ थाटात साजरा झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
मुंबई मराठी पत्रकार संघाचा 81 वा वर्धापन दिन पत्रकार भवनात काल मंगळवार, दि. 21 रोजी साजरा झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र वि. वाबळे होते. यावेळी विश्वस्त प्रकाश कुलकर्णी, अजय वैद्य, वैजयंती कुलकर्णी-आपटे, उपाध्यक्ष संजय परब, सुधाकर काश्यप, कार्यवाह विष्णू सोनवणे, कोषाध्यक्ष जगदीश भोवड उपस्थित होते.
या समारंभात पत्रकारितेच्या बदलत्या स्वरुपाविषयी आपले मत मांडताना न्या. भाटकर म्हणाल्या की, आता व्हॉटस्अॅप, टि्वटर, फेसबुक, इंस्टाग्राम अशी डिजिटल माध्यमे समाजमन व्यापून टाकत आहेत. या माध्यमांवर लोक मते मांडतात. मात्र तुम्ही पत्रकार समाजाला विचार देता. ही बदलत्या काळाची पावले आपण ओळखायला हवीत. या काळाचे संक्रमणही मागे जाईल. मात्र वर्तमानपत्र टिकून राहतील. कारण वर्तमानपत्रे विचार करायला भाग पाडतात. डिजिटल माध्यमांमुळे वृत्तपत्रांचा खप कमी झाला, असे म्हटले जाते. मात्र वृत्तपत्रे वाचणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पानाच्या ठेल्यापासून भारतात सर्वत्र वर्तमानपत्राचा वाचकवर्ग आहे. वस्तूनिष्ठ लेखन करणारे पत्रकार आहेत. जोपर्यंत ही वस्तूनिष्ठ पत्रकारिता टिकून राहील, तोपर्यंत लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित राहील. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचे, चौथ्या स्तंभाचे, पर्यायाने लोकशाहीचे रक्षण प्राणपणाने केले पाहिजे, अशी भूमिका न्या. भाटकर यांनी मांडली.
लोकशाहीचे मर्म आणि न्यायालय यांचे नाते समजून घेण्यासाठी भारताची राज्यघटना पत्रकारांनी वाचावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना सुंदर आहेच, पण समजून घेण्यासाठीसुद्धा सोपी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुमोटो आणि पीआयएल ही सर्वसामान्य नागरिकाला भारतीय न्यायव्यवस्थेने दिलेली महत्त्वाची आयुधे आहेत. या आयुधांचा वापर कसा करायचा याचे भान प्रत्येक नागरिकाला असायला हवे. नागरिकांना या आयुधांमुळे न्याय मिळण्याची प्रक्रिया सुलभ आणि गतिमान होत असल्याचा विश्वास न्या. भाटकर यांनी व्यक्त केला. समाजात सगळीकडेच वाईट प्रवाह असल्याचे बोलले जाते. मात्र, समाजातील पाच टक्के गुणीजणांवर हा समाज उभा राहतो असेही त्या म्हणाल्या.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी न्या. भाटकर यांच्या हस्ते पत्रकार खालील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
श्री. जमीर काझी (लोकमत) – 2021, श्री. उन्मेष पद्माकर गुजराथी (संपादक, दै. स्प्राऊटस्) – 2022 : शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा पद्मश्री यमुनाताई खाडिलकर पुरस्कार'. श्री. मनोहर काणेकर - 2021, श्री. सुरेश बिलये - 2022 : वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा
कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार.
श्री. अजय वैद्य – 2021, श्री. योगेश त्रिवेदी – 2022 : सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा समतानंद अनंत हरि गद्रे' पुरस्कार. श्री. रजनीश काकडे - 2021, उमा कदम - 2022 : वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा
अॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’ पुरस्कार.
श्री. प्रदीप वर्मा (माजी संपादक, लोकप्रभा) – 2021, श्री. वसंत भोसले (संपादक, लोकमत, कोल्हापूर) – 2022 : मुंबईबाहेरील ज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा `युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’.