उल्हासनगरातील पराजय झालेले उमेदवार धनंजय बोडारे यांनीही इव्हीएम घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची केली पोलिसांकडे मागणी
.
उल्हासनगर / प्रतिनिधी: २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत १४२ – कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील भाजपाचे विजयी उमेदवार गणपत काळू गायकवाड यांना त्यांच्याच कडे नोकरी करणारा सॉप्टवेअर इंजिनियर संतोष चौधरी याने इव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून विजयी करून दिले असल्याची एक क्लिप गेल्या चार पांच दिवस समाज माध्यमांवर प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाली आहे . या मध्ये तथ्य शोधून काढून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी. तसेच या मुळे निवडणूक निकालात आपल्यावर झालेल्या अन्यायाप्रती आपणांस योग्य न्याय मिळावा अशी मागणी या मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाचे मते घेतलेले शिवसेना प्रणित पराभूत उमेदवार धनंजय बोडारे यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री शाहू राज साळवे यांना दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे . या मुळे आता या कथीत इव्हीएम घोटाळा प्रकरणाला अधिक गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
आमदार गणपत गायकवाड यांनी परवा अशा प्रकारच्या चौकशीची मागणी पोलिसांसह निवडणूक आयोगाकडेही केली आहे .
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना – भाजपाची युती होती . त्या नुसार १४२ कल्याण पूर्व विधान सभा मतदार संघ हा भाजपाला सोडण्यात आल्यामुळे या मतदार संघातून गणपत काळू गायकवाड यांना भाजपाने उमेदवारी दिली होती . मात्र या मतदार संघात शिवसेनेचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व असल्यानेच कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करीत उल्हासनगर महापालिकेतील नगरसेवक धनंजय बोडारे यांना निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे करून त्यांच्या मागे प्रचंड अशी ताकद उभी केली होती . परंतु धनंजय बोडारे यांचा सुमारे साडेबारा हजाराने पराभव झाला होता .
परंतु हा पराभव नसून इव्हीएम मशीन मधील हेरा फेरी मुळेच पराभव झाल्याचे त्या व्हिडीओ मधील हॅकर संतोष चौधरी याच्या वक्तव्या वरून स्पष्ट होत असल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे . या बाबत सखोल चौकशी करून आपणांस न्याय मिळवून देण्याची विनंती या तक्रार अर्जात करण्यात आली आहे .
सदर लेखी निवेदन निवडणूक आयोगासह विविध संबंधीत अधिकाऱ्यां नाही पाठवण्यात आला आहे . निवेदन देते वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, मा .नगरसेवक महेश गायकवाड, सह संपर्क प्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पालंडे, रमाकांत देवळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .