पुण्याला मोदींच्या स्वप्नातील शहर बनवू – फडणवीस
lपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला बनवू. देशातील सर्वोत्तम शहर म्हणून तयार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांना दिले.
हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी फडणवीस बोलत होते. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री हरदीप पुरी, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे या वेळी उपस्थित होते.
फडणवीस यांनी हिंजवडी हा आयटी परिसर देशासाठी महत्त्वाचा असून, येथे लाखो युवक काम करत आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. या मेट्रोमार्गामुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन या युवकांची कार्यक्षमता वाढेल. राज्य सरकारने पुणे परिसरात रिंग रोडचे काम सुरू केले आहे. त्याचाही एकात्मिक वाहतुकीसाठी उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. माण-मारूंजे येथे सरकार टीपी स्किम उभारणार असून हिंजवडीपेक्षा अधिल लोक येथे काम करतील, अशी क्षमता या स्किममध्ये उभारणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पीएम आरडीए स्थापन करण्याचा कायदा कधीच बनला होता. मात्र आधीच्या सरकारमधील भांडणामुळे त्याची स्थापना लांबणीवर पडली. आमच्या सरकारने हे प्राधिकरण स्थापन करून पुण्याच्या प्रगतीला वेग दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.