ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरे !

वाटलं नां शीर्षक वाचून ? बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी ? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश मोहाडीकर हे १९५५ साली ‘श्याम’ हे नियतकालिक एकत्रितपणे चालवित होते. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका साथी दिनू रणदिवे आणि साथी अशोक पडबिद्री यांनी चालविली . प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे त्याचे शीर्षक देत असत तर बाळासाहेब ठाकरे हे मावळा या नांवाने व्यंगचित्र काढीत असत. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत मानाचे पान ज्यांना दिले असे दत्ताजी नलावडे, प्रमोद नवलकर हे राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून आले होते ‌ दादा कोंडके आणि साबिरभाई शेख हे पक्के दोस्त सुद्धा राष्ट्र सेवा दलाचेच. आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी १९८९ साली दैनिक सामना सुरु करतांना पहिले कार्यकारी संपादक म्हणून अशोक पडबिद्री यांच्यावर जबाबदारी सोपविली होती, तेही समाजवादीच. मधु दंडवते, प्रमिला दंडवते यांनी निवडणुकीत युती केली होती. मग ती महापालिका असो की लोकसभा. शिवसेना आणि समाजवादी हातात हात घालून काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे हे जात पात मानत नव्हते. ‘रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्न’ ही संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे मांडली होती. डॉ. मनोहर जोशी यांना ब्राह्मण म्हणून बाळासाहेबांनी मुख्यमंत्री किंवा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडले नव्हते तसेच नारायण राणे यांना मराठा, लीलाधर डाके -गणेश नाईक यांना आगरी म्हणून आणि छगन भुजबळ यांना माळी म्हणून नव्हे तर ते त्यांची कार्यक्षमता म्हणून त्या त्या पदावर निवडले होते. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांनी पदे देतांना त्यांची कार्यक्षमता पाहून पदे दिली होती. कडवट मुस्लिम नेते शेख साबीर हाजी करीम म्हणजेच साबिरभाई शेख यांना निष्ठावंत राष्ट्रभक्त म्हणून राज्याचा कामगार मंत्री बनविला. कर्तबगारी पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येकाला जबाबदारी दिली होती. ॲंथनी ब्रिटो, अंजुम महंमद, प्रीतिश नंदी, चंद्रिका केनिया अशा अनेकांना बाळासाहेब ठाकरे यांनी संधी उपलब्ध करून दिली. बाळासाहेब ठाकरे हे मुसलमान बांधवांच्या विरोधात नव्हते तर पाकधार्जिण्यांच्या ते विरोधात होते. मोहम्मद अझरुद्दीनची म्हणूनच त्यांनी वाखाणणी केली होती. जावेेद मियाँदाद सुद्धा ‘मातोश्री’ वर येऊन वाहव्वा करुन गेला होता. हुसेेेन दलवाई, वसंत चव्हाण यांंच्यासह अनेकांनी या भूूमिकेचं कौतुक केलं होतं. मला आठवतं, मी त्यावेळेला अकरा वर्षांचा होतो. १९ जून १९६६ या दिवशी बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी ‘शिवसेना’ या संघटनेची स्थापना केली. ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणत शिवसेनेनं आपलं स्वरुप दाखवायला सुरुवात केली होती. बाळासाहेबांवर प्रादेशिक वादाचे आरोप होऊ लागले. शिवसेनेच्या स्थापनेच्या बरोब्बर आठ दिवस आधी म्हणजे साने गुरुजींच्या पुण्यतिथीदिनी ११ जून १९६६ रोजी आमचे पिताश्री वसंतराव त्रिवेदी यांनी ‘आहुति’ साप्ताहिक अंबरनाथहून सुरु केलं होतं. शिवसेनेच्या स्थापनेमुळे बाळासाहेबांवर चौफेर टीका होत असतांना ‘आहुति’ मध्ये शिवसेनेचं स्वागत करणारा अग्रलेख वसंतरावांनी लिहिला होता.. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . शिवसेनेने आपली सुवर्ण महोत्सवी वर्षाची झंझावाती वाटचाल पूर्ण करुन विक्रमी शतकी घोडदौड करण्यास सिद्ध झाली आहे. एकचालकानुवर्ती संघटनेची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये दिमाखदार नोंद ही केवळ आणि केवळ शिवसेनेचीच आहे, ज्याचा प्रत्येक मराठी, प्रत्येक हिंदु आणि प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीला निश्चितपणे गर्व आहे. आज योगायोगाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेनेने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षानंतरही राज्य सरकार आणि कित्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये सत्तास्थानी राहून जनहिताचे कार्य केले आहे. केंद्रात सुद्धा शिवसेनेने सत्तास्थान भूषविले होते. . . . . . . . . . नंदमूरी तारक रामाराव म्हणजेच एन. टी. रामाराव यांनी तेलुगु भाषेच्या अस्मितेसाठी तेलुगु देसम् स्थापन केला आणि अवघ्या नऊ महिन्यात तो आंध्र प्रदेशात सत्तेवर आणला पण मराठी स्वाभिमान टिकविणाऱ्या शिवसेनेला सत्तेवर येण्यासाठी १९६६ पासून १९९५ पर्यंत इतकी वर्षे वाट पहावी लागली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळत असतं. १९९५ ते १९९९ या दरम्यान निव्वळ शिवसेनेची एकहाती सत्ता नव्हती. १९९५ ते १९९९ या काळात हिंदुत्वाची शिवसेना-भारतीय जनता पक्षाची अभेद्य युतीची शिवशाहीची सत्ता होती. २५ सप्टेंबर २०१४ रोजी ही अभेद्य युती तोडण्याची घोषणा झाल्यानंतर १५ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे एकटे महाभारतातल्या कुरुक्षेत्रावरच्या अभिमन्यूसारखे लढले आणि ६३ वाघ विधानसभेवर निवडून पाठविण्यात जबरदस्त यशस्वी ठरले. २८८ च्या विधानसभेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते म्हणून केवळ जनमताचा कौल आणि जनादेश शिरोधार्य मानून तसेच देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी आपली खुर्ची टिकवण्यासाठी जी साद घातली तिला प्रतिसाद म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थिर सरकार देण्यासाठी ५ डिसेंबर २०१४ रोजी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सत्तेत सहभागी असली तरी शिवसेनेने जनतेशी असलेली नाळ तुटू न देता सतत जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची, बाळासाहेबांनी दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्राप्रमाणेच आजवर भूमिका यथा योग्य पार पाडली आणि यापुढेही ही घोडदौड वायुवेगाने होणार हे निःसंशय. शिवसेनेच्या मंत्र्यांचं काम अगदी वाखाणण्यासारखं झाले. अर्थात, शिवसेनेच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीचा साधा आढावा जरी घ्यायचा म्हटला तरी डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी मुंबई विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधापेक्षा मोठे खंडशः ग्रंथ लिहिले तरी ते कमी पडतील. शिवसेनेने अनेक वादळे, असंख्य आव्हाने, अगणित संकटे पचवलीत, परतवून लावलीत आणि ‘सामना’ही केला. उन्हाळे, पावसाळे अनुभवले आणि आपली दाहकता, जाज्वल्य ज्वलाग्राही घणाघाती कणखर परखड विचार इतकेच नव्हे तर ज्वलंत हिंदुत्व या आभुषणांनी नटविली. या आभुषणांसमोर तकलादू कृत्रिमतेला कधीही शिवसेनेने स्थान दिले नाही. अनेक जण आले आणि गेले पण बाळासाहेबांच्या शिवसेनेला काही फरक पडला नाही. अनेकांना आम्ही म्हणजेच संघटना असा जो दर्प चढला होता त्यांना काळाने त्यांची जागा, पायरी दाखवून दिली. ‘वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’ याचा प्रत्यय आणून दिला. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . शिवसेना ही जगाच्या पाठीवरची अशी एकमेव संघटना आहे की ज्या संघटनेने आपल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या यशस्वी वाटचालीत अनेकांना लाल दिवा मिळवून दिला पण या लाल दिव्याचा मोह शिवसेनाप्रमुखांनी बाळगला नाही. लाल दिव्याच्या गाड्या आपल्या कार्यकर्त्यांना भरभरुन मिळवून दिल्या, अगदी आपली अर्धी हयात काँग्रेसमध्ये घालवूनही ज्यांना त्यांच्या हाय कमांड ने देण्याची दानत दाखविली नाही अशांनाही केवळ समाजकारण हाच ध्यास उराशी बाळगलेल्या बाळासाहेबांनी सत्तेची फळे चाखण्याची संधी मिळवून दिली. अर्थात ते ही संधीसाधूच निघाले. बाळासाहेबांवर सडकून टीका करण्याचं काम मीडिया अव्याहतपणे करीत आली पण त्याच मीडिया मधल्या एक दोन नव्हे तर तब्बल सहा पत्रकारांना संसदेत पाठवण्याचं धारिष्ट्य बाळासाहेबांनी दाखवलं. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . १९९५ साली शिवशाही सरकार आलं तेंव्हा त्या पहिल्याच वर्षी बाळासाहेबांवर दोन कौटुंबिक आघात झाले. आधी तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना काळाने आपल्यातून हिरावून नेलं आणि नंतर चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांना रस्ता अपघातात आपले प्राण गमवावे लागले. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . बाळासाहेबांवर मधल्या काळात यशस्वी हृदय शस्त्रक्रियाही झाली. अनेक संकटं लीलया झेलणाऱ्या या झुंझार सेनापतीनं १७ नोव्हेंबर २०१२ रोजी या जगाचा निरोप घेतला. १७ आणि १८ नोव्हेंबर २०१२ हे दोन दिवस केवळ मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या विश्वाने चमत्कार पाहिला. ज्या शिवतीर्थानं बाळासाहेबांच्या लाखोंच्या घणाघाती सभा अनुभवल्या त्याच शिवतीर्थानं हा झुंझार सेनापती आपल्या कुशीत चिरनिद्रेसाठी विसावतांना पाहिला. अरबी सागरालाही लाजवेल अशा जनसागराला आपल्या या अनभिषिक्त सम्राटाला अखेरचा जय महाराष्ट्र करतांना जसा पाहिला तद्वतच घटनात्मक सत्तेचं कोणतंही पद न भूषविणाऱ्या पण शासकीय तोफांची अंतीम सलामी स्वीकारतांनाही अवघ्या विश्वानं पाहिला. अवघी मुंबापुरी दोन दिवस एकाच जागी थांबली होती, थबकली होती, निःशब्द झाली होती. हा खऱ्या अर्थानं अनभिषिक्त सम्राट आणि हीच विश्वविक्रमी शिवसेना म्हणजे न भूतो न भविष्यती असंच म्हणावं लागेल आणि बाळासाहेब ठाकरे हे खरे समाजवादी होते, ढोंगी समाजवादी नव्हते हे सर्वच राजकीय पक्ष मान्य करतील. गोरेगाव पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाला ज्येष्ठ समाजवादी नेत्या साथी मृणालताई गोरे यांचे नांव देण्याचे काम शिवसेनेने करुन शिवसैनिक आणि सेवा दल सैनिक यांच्या मध्ये सेतू निर्माण केला. महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय परिस्थिती मुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे नेतृत्व स्वीकारले. सर्वच संकटांवर मात करुन ते यशस्वीपणे राज्य शकट चालविले. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद उद्धव आणि आदित्य या पितापुत्रांना निश्चितच आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या मार्गाने राज्य आणि देशाला निश्चित दिशा दिल्याशिवाय राहणार नाहीत. आई एकवीरा आणि आई तुळजाभवानी भरभरुन आशीर्वाद देत राहील हे निःसंशय. खरे समाजवादी आणि कडवट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा !!. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . -योगेश वसंत त्रिवेदी (

error: Content is protected !!